Damini Squad : महिलांना मदत करतेवेळी आमच्यातील आई जागी होते

आपली मुलगी, आपल्या कुटुंबातील एक महिला संकटात आहे, असे समजून आम्ही त्याच्या मदतीला धावतो. मायेने जवळ घेऊन मदतीसाठी विश्वास देतो. तेव्हा मुली घडलेला प्रकार सागण्यास तयार होतात. मात्र, कुठल्याही प्रकारची ओळख उघड न करता मदतीचा हात देत आम्ही मुलीला संकटातून बाहेर काढतो', असे दामिनी पथकाच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 20 Oct 2023
  • 12:25 pm
Damini Squad : महिलांना मदत करतेवेळी आमच्यातील आई जागी होते

महिलांना मदत करतेवेळी आमच्यातील आई जागी होते

'सीविक मिरर' आणि 'पुणे टाइम्स मिरर'च्या कार्यालयात दामिनी पथक झोन २ ची हजेरी, न घाबरता तक्रार करण्याचे केले महिलांना आवाहन

ओंकार गोरे

'ओळख उघड होऊन चारित्र्यावर डाग लागण्याच्या भीतीने किंवा कुटुंबीय आपली शाळा बंद करतील या भीतीने अल्पवयीन पीडित मुली तक्रार करण्यास घाबरतात. अशावेळी आमच्यातील आई जागी होते. आपली मुलगी, आपल्या कुटुंबातील एक महिला संकटात आहे, असे समजून आम्ही त्याच्या मदतीला धावतो. मायेने जवळ घेऊन मदतीसाठी विश्वास देतो. तेव्हा मुली घडलेला प्रकार सागण्यास तयार होतात. मात्र, कुठल्याही प्रकारची ओळख उघड न करता मदतीचा हात देत आम्ही मुलीला संकटातून बाहेर काढतो', असे दामिनी पथकाच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच महिलांनी तक्रार करण्यास घाबरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीविक मिरर आणि पुणे टाइम्स मिररच्या कार्यालयात बुधवारी (दि. १८) पुणे पोलीस झोन २ च्या दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी त्या बोलत होत्या. दिल्लीत २०१२ मध्ये निर्भयाप्रकरण घडले होते. त्या अनुषंगाने १५ जुलै २०१५ रोजी पुण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला १५ पथके तैनात करण्यात आली होती. काही महिन्यापूर्वी सदाशिव पेठेत भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार केले होते. शहराच्या मध्यवस्तीत गर्दीच्या ठिकाणी तरुणीचा जीव धोक्यात असताना संबंधित परिसरात दामिनी पथक कार्यरत नव्हते. या पार्श्वभूमीवर दामिनी पथकामध्ये वाढ करून १ जुलै २०२३ रोजी १५ वरून दामिनी पथकांची संख्या ४१ करण्यात आली. सध्या या पथकामध्ये ८७ महिला कर्माचारी कार्यरत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक काम करते, जेणेकरून संकटात अडकलेल्या महिलांना तत्काळ सेवा देता येईल. त्यांना संकटातून मुक्त करता येईल.

सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ९ पर्यंत दामिनी पथकाच्या माध्यमातून आम्ही महिलांना सेवा देत असतो. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये नेमण्यात आलेल्या मार्शल बिटमध्ये काही महिला कर्मचारी असतात. रात्रीच्या येणाऱ्या तक्रारीच्या माध्यमातून पीडित महिलांना सेवा देण्यासाठी त्या धाव घेतात. महिलांना तक्रार करण्यासाठी ३ हेल्पलाईन नंबर आहेत. तसेच आयुक्तांनी तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. याशिवाय, महिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. महिलांची तक्रार येताच कन्ट्रोल रूममधून कळवले जाते. त्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित महिलांना संकटातून सोडण्याचा प्रयत्न करतो, असे दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शिवाजीनगर दामिनी पथकातील हवालदार नीलम गायकवाड म्हणाल्या की, “शासकीय नोकरी असो किंवा खासगी, तेथे काम करणाऱ्या महिलांसाठी कुटुंब आणि नोकरीत समतोल राखणे एक आव्हान असते. सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांसाठी बाळ जन्मल्यावर ३ महिन्यांची सुट्टी मिळायची. आता त्यात वाढ करून ९ महिन्यांची सुट्टी मिळते. त्यामुळे आम्हाला सेवेत दाखल होण्यासाठी ९ महिन्यांचे बाळ घरी सोडून यावे लागते. ९ महिन्यांचे बाळ असल्याने डे केअरचा आधार घ्यावा लागतो. दिवसा डे केअरमध्ये आणि इतर वेळेत पतीसह कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागते. परंतु, दामिनी पथकात भरती होण्यापूर्वीच आम्हाला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ९ महिन्यांच्या मुलाला घरी सोडून सेवेत दाखल होण्याची आमची मानसिकताही तयार झालेली असते."

खडक दामिनी पथकातील कर्मचारी श्वेता वालेकर म्हणाल्या की, “समाजात परिवर्तन घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये समाज प्रबोधन करणे गरजेचे असते. यासाठी आम्ही शाळा, महाविद्यालयांबरोबर इतर संस्था, उद्यानातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. निर्जनस्थळी भेट देतो. दामिनी पथक पीडितांची मदत कशी करते हे समजण्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो."

लष्कर दामिनी पथकातील कविता हुद्दे म्हणाल्या की, "एकदा एक महिला विवस्त्र अवस्थेत फिरत असल्याचा कॉल आला होता. सदर ठिकाणी जाऊन जवळजवळ दोन तास पेट्रोलिंग केले. मात्र, असा कोणताही प्रकार घडल्याचे दिसून आले नाही. हा कॉल फेक असल्याचे समजले. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांकावरून शोध घेण्यात आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी फेक कॉल करू नये, अन्यथा कारवाई होईल."

सहकारनगर दामिनी पथकातील हवालदार वर्षा पाटील म्हणाल्या की, "अनेक अल्पवयीन मुलीसोबत शाळा, कॉलेजमध्ये छेडछाडीच्या घटना घडतात. परंतु, तक्रार करण्यासाठी मुली घाबरतात. आपले पालक आपली शाळा बंद करतील, अशी भीती त्यांना असते. तुम्ही साध्या ड्रेसमध्ये येऊन आमची मदत करा, अशी मागणी दामिनी पथकाकडे केली जाते. परंतु, साध्या ड्रेसऐवजी आम्ही इतर मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचून मदत करतो. त्यांची संकटातून सुटका करतो. त्यामुळे, कोणत्याही महिलांनी, मुलींनी न घाबरता आमच्याशी संपर्क करावा.

महिलांनी कुठे करावी तक्रार ?

महाराष्ट्र शासनाने १०९१, १०१९ आणि ११२ हे तीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. यावर पीडित महिलांनी तत्काळ संपर्क साधावा. याशिवाय, आयुक्तांनी ८९७५९५३१०० हा व्हॉट्सअप नंबर जाहीर केला आहे. या माध्यमातून महिलांना आपली तक्रार करता येईल. तसेच संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करता येईल. त्याचबरोबर दामिनी पथकात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक महिला पोलीस कर्माचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले हेल्पलाईन नंबर आणि आयुक्तांचा व्हॉट्सअप नंबर यावर तक्रार करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. मोबाईल फोन अनलॉक असतानाही नागरिकांना आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून तक्रार करता येते. त्यामुळे, पीडित महिलांनी यावर संपर्क करण्याचे आवाहन दामिनी पथकाकडून करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांना बांधली राखी

तृतीयपंथी पैसे मागताना अनेकदा समोरच्या व्यक्तीबरोबर वाद होतो. त्यांना चारित्र्यावरून बोलले जाते. समाजातील लोक वेगळ्या नजरेने पाहतात. तृतीयपंथीयांना आपल्यातून वेगळे टाकण्याचा प्रयत्न असतो. परंतु, दामिनी पथक सगळ्यांसाठीच असल्याने त्यांनाही आम्ही मद करते. अशातच महापालिकेमध्ये १० तृतीयपंथी नोकरी करतात. पालिकेच्या आवारात पेट्रोलिंग करत असताना, त्यांनी आम्हाला विचारले की, मॅडम आम्ही तुम्हाला राखी बांधू शकतो का ? आम्ही होकार देताच त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या रक्षाबंधनावेळी राख्या बांधल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जाणारे होते. तृतीयपंथी असतील तरी त्याही माणूस आहेत. त्यांच्याही मदतीसाठी आम्ही धावतो, नागरिकांनी कोणताही भेदभाव न करता दामिनी पथकाची मदत मागावी, असे आवाहन करताना शिवाजीनगर दामिनी पथकातील शिपाई सोनाली हिंगे यांनी घडलेला हा प्रसंग सांगितला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest