मराठी नंबरप्लेट... चालतंय की...; फॅन्सी नंबरप्लेट मात्र बेकायदेशीर
केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या ५० व्या कलमाप्रमाणे सर्व वाहनांच्या नंबरप्लेट इंग्रजी भाषेतच असणे बंधनकारक आहे. त्यामुळे रोमन आकड्यांशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील नंबरप्लेट अवैध मानल्या जातात. आजपर्यंत देवनागरीत नंबरप्लेट लावणार्यांविरोधात कारवाई करून त्यांना दंड आकारला जात होता. मात्र आता देवनागरी आकड्यांतील नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही.
या संदर्भात वाहतूक पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाहतूक पोलिसांनी मराठी नंबरप्लेटचा वापर करणे गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाहनांच्या नंबरप्लेट्सच्या नियमांबाबत स्पष्टीकरण देताना, वाहनाच्या क्रमांकाची पाटी मराठी भाषेत असणं हा काही गुन्हा नाही. फक्त प्लेटवरील नंबर हा फॅन्सी नसावा. किंवा दोन वेगवेगळ्या भाषा किंवा लिप्यांचे मिश्रण नसावे, असा नाव नियम आहे. भारतातील विविध राज्यांतील वाहने त्यांच्या राज्य भाषेतील अक्षरे आणि अंक वापरू शकतात.
वाहतूक विभागाचे अधिकारी याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, कायद्यानुसार रोमन आकड्यांतच नंबरप्लेट असल्या पाहिजेत. मात्र आजकाल अनेक वाहनमालक देवनागरी आकड्यांत नंबरप्लेट लावतात. पण समजा अन्य कोणत्या राज्यात अशा वाहनांना अपघात झाले तर तेथील स्थानिक पोलिसांना नंबरप्लेटवरून वाहनाचे रजिस्ट्रेशन शोधून काढण्यात अडचणी येतात. त्यामुळे देशभर रोमन आकड्यांतीलच नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट वाहनाच्या पुढे आणि मागे ठराविक जागीच लावणेही बंधनकारक आहे. तिचाकी अथवा चारचाकी वाहने या दोन जागांव्यतिरिक्त अन्यत्र देवनागरी नंबरप्लेट लावू शकतील.
नियम काय आहे?
वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार ‘सेंट्रल मोटार व्हेइकल ॲक्ट’ च्या कलम ५१ अन्वये ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनांवर नंबरप्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. हे नियम सांगतात-
– नंबर लिहिताना इंग्रजी किंवा देवनागरी लिपीचाच वापर करावा.
(उदा. ‘एमएच०४- एएन ६५४’ ऐवजी ‘महाराष्ट्र०४- एएन ६५४’ अशी नंबरप्लेट लावणे कायद्याने गुन्हा आहे; तसेच, हे क्रमांक देवनागरीतून लिहिणे नियमात बसत नाही.)
– दुचाकी वाहनांची पुढील नंबरप्लेटची लांबी २६ सेंमी, रुंदी ४ सेंमी, अक्षरांची उंची ३० मिलिमीटर असावी. अंकांची जाडी ५ मिलिमीटर असावी.
– पांढऱ्या पाटीवर काळी अक्षरे असावीत.
– नंबरप्लेटवर या क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो, आदी.) चालत नाही.
– हे क्रमांक स्पष्ट व सरळच असावे लागतात. ते फॅन्सी नसावेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.