डंपरने पादचारी महिलेला चिरडले
भरधाव डंपरने पादचारी महिलेला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील मुंढवा येथील महात्मा फुले चौकात मंगळवारी (दि. ११ ) दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.
लिलाबाई देवप्पा कांबळे (वय ६७, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाबाई कांबळे या बधे वस्तीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. भाजीपाला घेऊन दुपारी तीनच्या सुमारास महात्मा फुले चौकातून पायी घरी जात होत्या.
घरी जात असताना ओलांडत असताना खराडीकडून मुंढव्याकडे वळणाऱ्या मालवाहतूक हायवा क्रमांक एम.एच. १२ के.पी. २१६२ च्या धडकेने त्या चाकाखाली आल्या. या अपघातात लिलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.