Pune News : महावितरणच्या आवाहनाला मंडळांचा फाटा

घरगुती असो वा व्यावसायिक वीज मीटर असो... महिन्याचे देयक थकले रे थकले की महावितरणचे 'दक्ष' कर्मचारी तत्काळ वीज तोडण्यासाठी हजर होतात. सर्वसामान्य नागरिकांवर नियम आणि कारवाईचा बडगा उगारणारे महावितरण मंडळांच्या विनापरवाना वीज वापराबाबत मात्र,

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Tue, 3 Oct 2023
  • 11:20 am
Pune News

महावितरणच्या आवाहनाला मंडळांचा फाटा

पुण्यात ३८०० मंडळांपैकी अवघ्या ३७५ मंडळांकडेच अधिकृत वीजजोडणी; अनेक वर्षांत एकाही मंडळावर नाही कारवाई

लक्ष्मण मोरे

घरगुती असो वा व्यावसायिक वीज मीटर असो... महिन्याचे देयक थकले रे थकले की महावितरणचे 'दक्ष' कर्मचारी तत्काळ वीज तोडण्यासाठी हजर होतात. सर्वसामान्य नागरिकांवर नियम आणि कारवाईचा बडगा उगारणारे महावितरण मंडळांच्या विनापरवाना वीज वापराबाबत मात्र, ही 'दक्षता' दाखवत नाहीत. पुणे शहरात जवळपास ३ हजार ८०० गणेश मंडळे आहेत. यातील अवघ्या ३७५ च्या आसपास मंडळांनी यंदा महावितरणकडून रीतसर तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोड घेतले होते. जवळपास १०० मंडळांनी कायमस्वरूपी वीज जोड घेतलेले आहेत. उर्वरित साडेतीन हजार मंडळांनी महावितरणाच्या आवाहनाला फाटा दिल्याचे समोर आले आहे. मागील अनेक वर्षात महावितरणकडून बेकायदा वीज वापरणाऱ्या मंडळांवर एकही कारवाई करण्यात आलेली नाही.

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केवळ वल्गना ठरली आहे. आश्चर्य म्हणजे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात विद्युत खांबांवरून वीज घेणारे एकही मंडळ आढळून आलेले नाही. मग, साडेतीन हजार मंडळांनी वापरलेली वीज आली कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महावितरणकडून सर्व धर्मीयांच्या उत्सवासाठी घरगुती दराने वीजदर आकारण्यात येतो. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरती अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. मात्र, त्याला अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही.

मागील वर्षी अवघ्या २०४ मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोड घेतलेले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार होता. मात्र, ही सवलत देऊनही मंडळांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या व तत्पर वीजसेवा देण्यासाठी पुणे परिमंडळातील महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले होते.  वीजसुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करण्याच्या  तसेच गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची (अनामत) रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या होत्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  पुणे परिमंडळातील पूर्वतयारीचा पवार यांनी आढावादेखील घेतला होता. तरीदेखील, बेकायदा वीज जोड असलेली मंडळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास कशी आली नाहीत, असा प्रश्न आहे. किमान जी मंडळे नोंदणीकृत आहेत, त्यांनी तरी अधिकृत वीज जोड घेणे अपेक्षित आहे. मात्र, यातील बहुतांश मंडळांची याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या काळात पाऊस असल्याने अधिक धोका संभवतो. त्यामुळे विद्युत सुरक्षेच्या निकषांचे पालन केले जाणे देखील आवश्यक असते. सुदैवाने गणेशोत्सवात अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही. मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील महावितरणकडून वारंवार करण्यात येत होते. यामध्ये सुरक्षेसंबंधी सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु, महावितरणच्या कोणत्याही आवाहनाला आणि कारवाईच्या इशाऱ्याला मंडळांनी गांभीर्याने घेतले नाही. नियमबाह्य पद्धतीने वीज वापरणाऱ्या मंडळांवर महावितरणकडून खरोखरीच कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात माहिती घेण्याकरिता मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

गणेश मंडळांना उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोड देताना सुरक्षा ठेव घेतली जाते. ही सुरक्षा ठेव मंडळांनी अर्ज केल्यानंतर पुन्हा त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मागील वर्षी (२०२२)  पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड या तीन तालुक्यांतील २०४ सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरती वीजजोडणी घेतली होती. ३७ गणेश मंडळांकडून ३ लाख २ हजार १६७ रुपयांच्या सुरक्षा ठेवीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते मंजूर करण्यात आले, तर ६२ गणेश मंडळांनी गणेशोत्सवातील वीज वापरापोटी दिलेल्या बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे त्यांची ४ लाख ६७ हजार ७८५ रुपयांची सुरक्षा ठेव वीजबिलापोटी समायोजित करण्यात आली आहे.  मात्र, अद्यापही ११९ गणेश मंडळांनी ६ लाख ११ हजार ८६२ रुपयांची सुरक्षा ठेव परत मागण्यासाठी अर्ज केलेला नाही असे महावितरणकडून सांगण्यात आले.

महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी अधिकृत वीज जोड घ्यावेत, असे आवाहन केले होते. तसेच, विद्युत खांबावरून वीज घेऊ नये, असे परिपत्रक काढले होते. याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, आम्हाला विद्युत पोलवरून कनेक्शन घेतल्याची एकही तक्रार मिळाली नाही. तशी तक्रार असल्यास पाहणी करून कारवाई केली जाईल. गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या ८ स्टॉलने विद्युत खांबांवरून घेतलेली वीज तोडण्यात आली. त्यांना ताकीद देण्यात आली आहे. जी मंडळे बेकायदा वीज वापरत असतील त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल.

- श्रीनवास कंदूल, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका

महापालिकेचे दुर्लक्ष आणि आर्थिक नुकसान

मंडळांकडून अनेकदा महापालिकेच्या विद्युत खांबांवरून वीज ओढली जाते. त्यांचे वीज बील महापालिकेला भरावे लागते. महापालिकेच्या विद्युत विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. पुणेकरांच्या कररूपी पैशांमधून महापालिकेला ही वीज बिले भरावी लागतात. अनेकदा दुकानदारांकडून उत्सव काळात वीज घेतली जाते. अशाप्रकारे वीज देणे हे देखील बेकायदा समजले जाते. याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. यामध्ये महावितरणचे तसे पाहता आर्थिक नुकसान होत नाही. महापालिका आणि व्यावसायिक यांच्याकडून वीज बिल भरणा केला जातो. परिणामी ही बिले ग्राहक आणि करदात्यांच्या खिशामधून भरली जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest