महाराष्ट्राने २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा - राज्यपाल
भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडातज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्याने आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयारी करण्यात यावी. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावरही भर द्यावा लागेल.
महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारे पहिले राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम सामुहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडेही लक्ष द्यावे लागेल, असे सांगतानाच राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
समर्पित प्रशिक्षक आणि निवृत्त खेळाडू ही आपली खरी शक्ती आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी त्यांचे सहकार्य आणि पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंची महत्वाकांक्षा, निष्ठा आणि संकल्प त्यांना अडचणीतून मार्ग काढत यशाला गवसणी घालण्यात मदत करेल, असेही बैस म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.