चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला.
आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे, यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली. मिलिंद राहूरकर गुरुजी यांच्या पौरहित्यखाली हा अभिषेक करण्यात आला.
याबाबत बोलताना मिलिंद राहूरकर गुरुजी म्हणाले की, “चांद्रयान ३ च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चांद्रयान २ च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयानाने १४ जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे.”
“त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही. नुकतेच २० ऑगस्टला, रशियाचे लुना २५ हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल”, असे गुरूजी म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.