मंगलमुर्तीच्या रंगरंगोटीची लगबग, गणेशमूर्ती खरेदीसाठी व्यावसायिक पेनमध्ये दाखल
पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात. यंदा गणोशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाच्या मूर्ती बनवण्यासाठीची लगबग सुरू आहे. मूर्तिकार मूर्ती कामात मग्न असून, रंगरंगोटीलाही सुरवात झाली आहे. त्यामुळे आतापासून व्यावयासिक गणेशमुर्ती खरेदीसाठी पेनमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
दरवर्षी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. साऱ्यांनाच गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागून रहिलेली असते. यंदा १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. सर्वत्र गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवासाठी मुर्तींची खरेदी ही पेनमधून मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे, मुर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. विविध आकारांच्या, आकर्षक व सुंदर रेखीव काम केलेल्या मूर्ती साकारल्या जात आहेत. वाळलेल्या मूर्तींच्या रंगकामाला सुरवात झाली आहे.
गणेशोत्सवाला अवघे दोन महिने उरले असल्याने मूर्तिकामासाठी कुंभारवाड्यात लगबग दिसून येत आहे. कुंभार कुटुंबातील कलाकार रात्रंदिवस मूर्ती काम व रंगकामात गुंतले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात कोण कोणते उपक्रम राबविले जाणार याविषयी बैठका सुरू आहेत. एकंदरीतच यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची तयारी सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.