गृहनिर्माण संस्थेला १ लाखाचा दंड
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुण्यातील येवलेवाडी-कोंढवा प्रभाग कार्यालयाने ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर गृहनिर्माण सोसायटीने धनादेशामार्फत दंडाची रक्कम भरली आहे.
कोंढवा-येवलेवाडी विभागीय कार्यालय हद्दीतील राजगृह गृहनिर्माण संस्थेने ड्रेनेजचे पाणी उपसून रस्त्याच्या कडेला सोडले होते. मात्र, हे पाणी आजबाजूच्या सोसायटी आणि घरांमध्ये वाहून जात होते. यामुळे आरोग्याचा धोका लक्षात घेऊन संतप्त झालेल्या रहिवाशांना कोंढवा-येवलेवाडी विभागीय कार्यालयात तक्रारी नोंदवल्या होत्या.
रहिवाशांच्या तक्रारीनंतर विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्तांनी राजगृह गृहनिर्माण संस्थेवर गुरुवारी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईनंतर संस्थेने धनादेशामार्फत १ लाख रुपयांची रक्कम जमा केली. यावेळी प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विकास मोरे म्हणाले की, “यापुढे कोणत्याही दुर्गंधीयुक्त साहित्याची परिसरात टाकले जाणार नाहीत. दुर्गंधीयुक्त साहित्य टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”