खेड बंदला हिंसक वळण, मराठा आंदोलकांनी रस्त्यावर जाळला टायर
जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमारा केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात पोलीस आणि सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्वकाही बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, खेड तालुक्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
जालन्यामध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या विविध भागात बंदची हाक देण्यात आली आहे. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोणावळ्यासह मावळात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व व्यवहार ठप्प होते.
मात्र, आळंदी-मरकळ रोडवर मराठा आंदोलकांनी चक्काजाम केला आहे. रस्त्यावर उतरत टायर जाळून सरकारचा निषेध केला. मरकळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.