जलतरण तलावाचे लॉक उघडण्याचा महापालिकेला पडला विसर, कोट्यावधी रुपये गेले पाण्यात
पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) कोट्यावधी रुपये खर्च करुन खराडी (Kharadi) भागातील रक्षक नगर येथे मोठा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. तलाव नागरिकांसाठी खुला केल्यानंतर केवळ एकवर्षच नागरिकांना त्याचा आनंद घेता आला. त्यानंतर कोरोना (Corona) महामारीमुळे तलावाला लॉक लावण्यात आले होते. कोरोनाची लाट जावून आता चार होत आले (Rakshak Nagar) तरी महापालिकेकडून तलाव अद्याप सुरु करण्यात आला नाही. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून महापालिकेला तलावाचे लॉक उघडण्याचा विसर पडला आहे का असा प्रश्न उपस्थित करत तत्काळ तलाव पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.
कोरोनामुळे तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर तलावाच्या परिसरातील हॉस्टेलमध्ये क्वारटाईन केंद्र सुरु करण्यात आले होते. कोरोना संपल्यानंतर तलाव सुरु करण्यात येईल, अशी खराडीकरांना आशा होती. मात्र तलाव बंद राहिल्याने तलावाच्या तळाचा भाग पूर्णपणे उखडला असून त्यामुळे जलतरण तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. टेंडर प्रक्रिया राबवून तलावाचे काम करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र काही गेल्या चार वर्षा केवळ प्रक्रिया राबविली जाईल. या पलिकेकडे अद्यापपर्यंत पालिकेने काहीही केले नाही. असे येथील नागरिकांनी सीविक मिररला सांगितले. तसेच तलावाचे काम झाल्यानंतर तो नागरिकांसाठी खुला करण्यासाठी महापालिकेला आठवण करण्याची वेळ आली होती. त्यामुळे सुरवातीपासून तलावाबाबत पालिकेचे अधिकारी उत्साही आहेत हे दिसून आले होते. कोरोनामुळे तलाव बंद झाल्याने अधिकाऱ्यांच्या मनासारखेच झाले आहे. त्यामुळे आता ते सुरु करत नसावेत असा नागरिकांचा आरोप आहे.
रोगा पेक्षा इलाज भयंकर...
जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदाराच्या माध्यमातून काम करावे लागणार आहे. तलावाचा तळ उखडला आहे. साफसफाई तसेच परिसराची स्वच्छता, कपडे बदलण्यासाठी केलेल्या रूमचीही तोडफोड झाली आहे. सर्वत्र कचरा साठला आहे. तसेच टाईल्स तुटल्या आहेत. विद्युत उपकरांची दुरुस्ती करावी लागणार असून यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे जेवढे पैसे बांधण्यासाठी गेले त्यापेक्षा दुरुस्तीला अधिका खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे हे प्रकरण आता रोगापेक्षा इलाज भयंकर असेच झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
झोपलेल्या क्रीडा विभागाला जाग कधी येणार ?
शहराच्या पूर्वकडील भागात महापालिकेचा मोठ्या स्वरुपात बांधण्यात आलेला एकमेव जलतरण तलाव आहे. त्यामुळे या भागात नव्याने जलतरणपट्टू घडण्यासाठी तलावाचा उपयोग होऊ शकला असता. मात्र कोरोनानंतर सर्व जग सुरु झालेले असताना तलाव बंदच ठेवण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असले तरी महापालिकेच्या क्रीडा विभागाने एकदाही या तलावाची पाहणी केली नाही. तसेच अधिकाऱ्यांनी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यावर नागरिकांनी संताप व्यक्त करुन कोरोनापासून झोपलेल्या क्रीडा विभागाला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या जलतरण तलावात कोरोना रूग्णांचे बेड अद्यापही तसेच पडून असल्याचे दिसून आले.
ठेकेदारच पुन्हा होणार मालामाल
कोरोनानंतर पुन्हा सुरु केला असता तर दुरुस्तीसाठी मोठा खर्च करण्याची वेळ आली नसती. आता नुकसान चांगलेच झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे या कामातून पुन्हा ठेकेदारच मालामाल होणार आहे. असे जाणकरांचे म्हणणे आहे. महापालिकेने अजून वेळ घालवण्यापेक्षा तत्काळ तलावाची पाहणी करुन दुरुस्तीची कामे सुरु करुन घ्यावी. आणि नागरिकांसाठी खुला करावा.
तलाव सुरु करण्यासाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. दुरुस्तीची कामे तत्काळ सुरु करावीत अशी मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊन कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पालिकेमुळे जलतरणपट्टूंचे नुकसान होत आहे. उन्हाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन तलाव सुरु करण्यात यावा.
- बापूसाहेब पठारे, माजी आमदार, वडगावशेरी मतदारसंघ.
महापालिका आयुक्तांना तलाव सुरु करण्यात यावा, याबाबत अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. आता सर्वकाही सुरु असताना पालिकेने तलाव देखील सुरु करावा. तत्काळ दुरुस्तीची कामे सुरु करावीत.
- महेंद्र पठारे, माजी नगरसेवक
महापालिकेकडे गेल्या चार वर्षांत अनेक वेळा तलाव सुरु करण्याबाबत पत्र दिले आहे. तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे तलावाची वाट लागली आहे. पालिकेने वेळीच काम सुरु करावे, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल.
- संतोष भरणे, शहर उपाध्यक्ष, भाजप
खराडी परिसरातील तरुणांना खासगी जलतरण तलावात जावे लागत आहे. सर्वसामान्यांना खासगी तलावाचे दर न परवडणारे आहेत. नागरिकांच्या पैशांतून बांधलेला तलाव नागरिकांसाठी खुला केलाच पाहिजे. पालिकेच्या क्रीडा विभागाला आता जागे व्हावेच लागेल. पालिकेने नागरिकांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा.
- दर्शना स्वप्नील पठारे, सामाजिक कार्यकर्त्या