केशवनगर मांजरी रस्ता रडारवर; महापालिका करणार अतिक्रमण मुक्त रस्ता
अमोल अवचिते
पुणे : खराडी बाय पास रस्त्यावरील मुंढवा गावातील महात्मा फुले चौकात (PMC) अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता केशवनगर मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार असून त्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केशवनगर-मांजरी रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदण्यात आला होती. रस्ता खोदल्यानंतर बुजवताना त्यावर डांबरीकरण करणे आपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने डांबर न टाकता रस्त्यावर मुरुम टाकून बुजवला. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबतचे वृत्त सिवीक मिररने प्रसिध्द केले होते. त्यानंतर आता रस्त्यावर डांबर टाकण्यात येत आहे. तसेच सिमेंट युक्त खडी टाकण्यात आली आहे. यामुळे धुळीचा त्रास कमी झाला आहे. असे असले तरी मंजूर डीपीनुसार रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. आता आहे त्यापेक्षा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर केलेले अतिक्रमण महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडून अतिक्रमण करणाऱ्यांना विनंती अर्ज करण्यात येणार आहे. तसेच नोटीसा देखील देण्यात येणार आहेत. त्यानंतर धडक अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाणार आहे. या रस्त्यावर सध्या ड्रेनेज लाईनचे काम झाले. यानंतर पिण्याच्या पाईप लाईनचे काम आणि विद्युत विभागाची कामे राहिली आहेत का याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर या रस्त्याला अतिक्रमण मुक्त केले जाईल आणि रुंदीकरण करुन डांबरीकरण केले जाणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केशवनगर- मांजरी या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेकडून या गावांना पायाभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र पालिकेकडून यासुविधा देखील मिळत नसल्याने गावकरी त्रासले आहेत. केवशनगरमध्ये लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे. याभागात मोठ मोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. तसेच अनेक अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत. इमारती बांधकाताना कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. इमारतीची संख्या, राहण्यास येणाऱ्या कुटुंबांची संख्या तसेच रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या याचा कोणताही विचार न करता रस्ते रुंद आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या सोबतच पाण्याची परिस्थिती देखील या भागात बिकट आहे. बोरच्या माध्यमातून सध्या पाण्याची गरज भागविली जात आहे. परंतु भविष्यात पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने रस्ता देताना पाण्याची देखील सोय लावावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
केशवनगर-मांजरी रस्त्याच्या कामासाठी नागरिकांकडून हवे ते सहकार्य महापालिकेला देण्यास येथील नागरिकांची तयारी आहे. आम्हाला फक्त पायाभूत सुविधा चांगल्या हव्यात. महापालिकेकडून कारवाई करताना कोणाचे नुकसान होणार नाही, याची देखील काळजी घ्यावी. रस्त्याचे रुंदीकरण झाले तर नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. या रस्त्यावर जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंढवा गाव, मांजरी गाव, महादेव नगर, खराडी, वाघोली या गावांमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे वाहतुकीची वर्दळ चांगलीच आहे. पालिकेने अधिक वेळ न घालवता तसेच लोकसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी या कामासाठी मंजूरी द्यावी.
- अमर देशमुख, नागरिक, केशवनगर
मुंढवा चौकातील अतिक्रमण ज्याप्रकारे काढण्यात आले, त्याच प्रकारे केशवनगर मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. मुंढवा, केशवनगर, मांजरी रस्त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभागाची काही कामे राहिली आहेत काय याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना काळजी करु नये.
- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.