वारकऱ्यांना पिकअप जीपची धडक, एका तरुणाचा मृत्यू
पुणे : कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या धडकेत एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता घडला.
या अपघातात कृष्णा नागोराव गरुड (वय २३ रा. मटकर आळा, ता. जिल्हा परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला तर सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय २३, रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी) रितेश राजाराम ब्रम्हे (वय १८ रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी), चक्रधर कोपलवर (वय २८ रा. साडेगाव ता. जि. परभणी) हे तीन वारकरी जखमी झाले आहेत. या जखम रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरहून आळंदीकडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून असलेल्या पीकअप जीपने चार वारकऱ्यांना धडक दिली. अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालखी सोहळ्यात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहन चालकास तात्काळ अटक केली आहे. अरुंद रस्ते व सुरू असणारे महामार्गाचे काम यामुळे सिंगल लेनवर भाविक व वाहने एकत्रित प्रवास करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून वारकऱ्यांची काळजी घेतली जात आहे. परंतू अपघात झाल्याने पुन्हा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेची दखल घेत पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
घडलेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. वारकरी संप्रदायातील युवा पिढीतील एक उमलते नेतृत्व काळाने हिरावले. घटनेची माहिती मुख्यमंत्री कार्यालयास देत मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी तानाजी जाधव त्यांनी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना या सर्व अपघात ग्रस्त परिवारांच्या सोबत आहे.
- अक्षयमहाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना