सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या कमवा व शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामाच्या मोबदल्यात मानधन दिले जाते. या मानधनाचा विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी उपयोग होतो. मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी दिलेली लिंक गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. परिणामी इच्छा असूनही विद्याथ्र्याना या योजनेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा या योजनेअंतर्गत काम देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यातच विद्यार्थ्यांमधील स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी कमवा व शिका योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे पूर्वी हजारो विद्यार्थी या योजनेअंतर्गत काम करून शिक्षण घेत होते. मात्र, या योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाने या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली जात आहेत.
पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी नसलेल्या आणि कमवा व शिका योजनेत काम करत नसताना काही मुलांच्या खात्यावर विद्यापीठातर्फे रक्कम जमा केली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक असल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना या योजनेत प्रवेश दिला जात नाही. विद्यापीठातील नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक-दोन महिन्यांतच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु, काही कारणास्तव कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेत पुन्हा संधी मिळत नाही. परिणामी विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. सध्या कमवा व शिका योजनेची लिंकच बंद आहे. विद्यापीठ आवारातील विविध विभागांची स्वच्छता करण्याचे काम विद्यापीठातर्फे कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना दिले जात होते. परंतु, आता विविध विभागांमध्ये कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र, सध्या फारच कमी विद्यार्थी या योजनेत काम करत आहे, तर अनेक विद्यार्थी काम करण्यास इच्छुक आहेत.