पिंपळ पान
या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी
इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती
अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे...
चित्रकार रघुनाथ सासवडकर यांची चित्रकला पाहताना कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या ओळींमध्ये थोडा बदल करून इथल्या पिंपळपानावरती अवघे 'चित्र' तरावे असंच म्हणावंसं वाटतं. याचं कारण सासवडकरांनी आपली चित्रकला साकारली ती पिंपळपानाला आलेल्या जाळीवर म्हणजेच जाळीदार पानावर. एवढी वैशिष्ट्यपूर्ण कलोपासना करताना त्यांनी कधीही प्रसिद्धीचा विचार केला नाही, स्वतः काढलेलं एकही चित्र विकलं नाही. त्यामुळे आता त्यांच्या मुलाने आणि मुलीने वडिलांच्या या अनोख्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली आहे.
रघुनाथ सासवडकर यांनी सर्वप्रथम मुंबईत एका चित्रकाराला पिंपळाच्या जाळीदार पानावर चित्र काढताना पाहिलं. त्यांनी त्या व्यक्तीला ती कला शिकवण्याची विनंती केली. मात्र, त्या व्यक्तीने थेट नकार दिला. सासवडकर यांच्या मनाला ते लागलं आणि त्यांनी स्वतः ती कला आत्मसात करण्याचा निश्चय केला. सासवडकर यांच्या कन्या स्वाती सासवडकर-कुंभार म्हणाल्या, 'वडिलांनी पिंपळ पानावर त्यांच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षी पहिलं चित्र साकारलं. त्यासाठी त्यांना दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागला. हळूहळू कामाचा वेग वाढत गेला. वय वर्षे २५ ते ८३ या काळात त्यांनी सुमारे ४५० चित्रे पिंपळ पानावर काढली. ही सर्व चित्रे व्यक्तिचित्रे आहेत.'
सासवडकर यांनी संत ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पु. ल. देशपांडे, गुलजार, भारतरत्न लता मंगेशकर, मायकल जॅक्सन... अशा विविध व्यक्तिमत्त्वांची चित्रे पिंपळ पानावर रेखाटली आहेत. याबद्दल माहिती देताना सासवडकर यांचे पुत्र अभिजित यांनी सांगितले की, 'चित्रकलेत व्यक्तिचित्र (पोट्रेट) काढणं सर्वांत अवघड मानलं जातं आणि त्यातही ते पिंपळ पानावर काढणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. यासाठी चित्रकलेतल्या कौशल्यापेक्षाही प्रचंड मोठ्या प्रमाणावर संयम आणि चिकाटी असणं गरजेचं आहे. पिंपळ पान हाताळताना ते अनेकदा तुटतं, फाटतं, रंग विस्कटतात, ओघळतात. त्यामुळे खूप संयमाने काम करावं लागतं. १००-१५० पानांमधून १०-१५ पानांवर मनासारखी जाळी तयार होते. त्यानंतर त्यावर काम केलं जातं.'
स्वाती सासवडकर-कुंभार ह्यांनी सांगितलं की, वडिलांना रंगाच्या गंधाचा त्रास व्हायचा. त्यांना दमादेखील होता. मात्र, त्यावर मात करून त्यांनी आपली कलासाधना सुरू ठेवली. त्रास झाला की, ते तेवढ्यापुरतं काम थांबवायचे आणि पुन्हा जोमाने चित्र काढू लागायचे.
ना विक्री, ना प्रसिद्धी
अभिजित सासवडकर यांनी सांगितले की, वडिलांनी कधीच कला विकली नाही. त्यांनी त्यांचं एकही चित्र विकलं नाही किंवा त्याचं प्रदर्शन भरवलं नाही. ते स्वतःच्या आनंदासाठी चित्र काढायचे. त्यामुळेच आता आम्ही हा ठेवा समाजापुढे ठेवत आहोत.
सासवडकरांची चित्रे समाजापर्यंत पोहोचावी आणि रसिकांना त्यांचा आस्वाद घेता यावा या दृष्टीने आता पिंपळ पान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जात आहे. नुकतेच त्यांचे दुसरे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारा निधी हा समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी दिला जातो, असे अभिजित सासवडकर आणि स्वाती सासवडकर-कुंभार यांनी सांगितले. वडिलांची कला रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी अभिजित आणि स्वाती सासवडकर यांनी २०१५ मध्ये पिंपळपान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रदर्शन भरवून त्याद्वारे मिळणारा निधी दुर्बल घटकांसाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे.