संग्रहित छायाचित्र
- यशपाल सोनकांबळे
सावित्रीबाई फुले पुणे (Savitribai Phule Pune University) विद्यापीठाच्या निकालांना उशीर होण्यामागे 'अंतर्गत मुल्यांकनातील गोंधळ' हे एक महत्त्वाचे कारण आहे. मुल्यांकनाला उशीर करण्यापासून ते विद्यार्थ्यांना चुकीचे गुणदान करण्यापर्यंतचे प्रकार उन्हाळी परीक्षेत घडले होते. आता हे टाळण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सूचना फलकावर लावण्याचा नियम काटेकोर (Notice board) पाळणे बंधनकारक असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
अंतर्गत गुणदानातील गोंधळामुळे विद्यापीठाने नुकतेच ७४ महाविद्यालयांवर कारवाईही केली होती. आता विद्यापीठाच्या वतीने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ ची सत्र परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येत असून, प्रात्यक्षिक परीक्षेची घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनानंतर विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा विभाग आणि महाविद्यालयांमध्ये समन्वयाची गरज आहे.
प्रत्येक वेळी विद्यार्थीच या संपूर्ण प्रक्रियेत भरडला जात असून, यंदा कोणती खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांना विचारली असता, ते म्हणाले, 'कोरोनानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक पूर्वपदावर येत असले तरी एका महिन्याचा विलंब अजूनही आहे. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्यासाठी परीक्षेशी निगडित सर्व घटकांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अंतर्गत मुल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांसाठी १५ दिवस सूचना फलकावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांनी हा नियम पाळल्यास गोंधळ टळेल.' बहुतेक महाविद्यालयांमध्ये अंतर्गत गुण सूचना फलकावर घोषीत करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुणदानासंबंधी कोणतीच माहिती मिळत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.