रेल्वे सुरक्षा दल तपासणी करताना घाबरून प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
लक्ष्मण मोरे
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिकांसाठी 'डेक्कन क्वीन' म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. याच डेक्कन क्वीनमध्ये मागील काही दिवसांपासून काही प्रवासी दारू पिऊन येत असल्याच्या तसेच डब्यात जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारी थेट महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागापर्यंत पोहोचल्या. त्यानुसार 'डेक्कन क्वीन' मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि तिकीट तपासनीस (टीसी) यांनी तपासणी सुरू केली. डब्यात प्रवाशांकडे तपासणी सुरू असतानाच पोलिसांच्या भीतीने त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरपीएफ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराने हा प्रवासी घाबरल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या प्रवाशाचे शवविच्छेदन नायब तहसीलदारांच्या समक्ष ससून रुग्णालयात करण्यात आले. पुणे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. कुलतरणसिंग लालचंद सेठी (वय ६६, रा. बी ६, गुरू तेगबहादूर सोसायटी, औंध रोड, रेंजहिल्स, खडकी) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
डेक्कन क्वीनमध्ये डी / ६, डी/ ७ डब्यात दारू पिऊन लोक प्रवास करत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी राज्याच्या गृह (परिवहन) विभागाकडे केली होती. काही प्रवासी जुगार खेळत असल्याचेही या तक्रारीमध्ये नमूद केले होते. गृह (परिवहन ) विभागाने याबाबत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या महाव्यवस्थापकांना माहिती कळवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयाकडून या संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून सूचना देण्यात आल्या होत्या.
या कारवाईसाठी तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे संयुक्त पथक नेमण्यात आले होते. पथकाद्वारे शनिवारी 'डेक्कन क्वीन' मध्ये तपासणी सुरू करण्यात आली होती. या पथकात एक उपनिरीक्षक, तीन कर्मचारी यांच्यासह दोन तिकीट तपासनीस (टीसी) होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, सेठी यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय आहे. ते मुंबईच्या ओपेरा हाऊस मार्केटमधून ऑटोमोबाईल साहित्य खरेदी करून त्याची पुण्यातील व्यावसायिक, वाहनधारक, गॅरेज मालकांना विक्री करीत असतात. त्याकरिता ते आठवड्यामधून दोन वेळा मुंबईला जात होते. शनिवारी सेठी नेहमीप्रमाणे डेक्कन क्वीनने मुंबईला चालले होते. सेठी हे शनिवारी 'डेक्कन क्विन' गाडी नं. १२१२३ बोगी नंबर डी/७ मधून प्रवास करीत होते. हे पथक त्यांच्या बोगीमध्ये आले असता काही प्रवाशांची त्यांनी विचारपूस केली. नंतर कुलतरणसिंग यांच्याकडे चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी आणि तिकीट तपासनिसांनी त्यांना दमात घेऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराने कुलतरणसिंग धास्तावले. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांना छातीमध्ये त्रास सुरू झाला. काही कळायच्या आतच ते जागेवर कोसळले. ते बेशुद्ध पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, बोगीमधून प्रवास करीत असलेल्या डॉक्टर प्रवाशांनी त्यांना तपासले. त्यांना तत्काळ 'सीपीआर' देण्यात आला. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही.
ही माहिती प्रवाशांनी तसेच पोलिसांनी लोणावळा रेल्वेस्थानकाचे उपस्थानक प्रबंधकांना कळविली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लोणावळा लोहमार्ग पोलिसांना (जीआरपी) याबाबत कळविले. लोहमार्ग पोलिसांना कुलतरणसिंग यांच्यावर उपचार करण्याबाबत लेखी मेमो दिला. त्यानुसार, लोणावळा लोहमार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी कुलतरणसिंग यांना लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना रात्री साडेनऊच्या सुमारास मृत घोषित केले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी बी. जे. मेडिकल कॉलेज ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखांना पत्र देऊन शवविच्छेदन करण्याबाबत कळवले. कुलतरणसिंग यांचे शवविच्छेदन नायब तहसीलदारांसमोर करण्यात आले. हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हीडीओ शूटिंगमध्ये करण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, या घटनेचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार, सुरुवातीला कुलतरणसिंग यांच्यासह प्रवास करीत असलेल्या प्रवाशांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाच्या तपासणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत. पोलिसांनी कुलतरणसिंग यांच्या मुलाचा जबाब नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. बोगी तपासणीसाठी गेलेल्या 'आरपीएफ' च्या जवानांचे आणि तिकीट तपासनिसांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. तसेच कुलतरणसिंग यांच्यासह प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांकडे चौकशी केली जात असून त्यांचेही जबाब नोंदविण्यात येत आहेत. नायब तहसीलदारांसमोर शवविच्छेदन केले असून इन कॅमेरा 'इन्क्वेस्ट पंचनामा' करण्यात आला आहे. कुलतरणसिंग यांची फेब्रुवारी महिन्यात एंजीओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना दोन ठिकाणी ब्लॉकेजेस असल्याचे निदान झाले होते. चौकशीअंती जे सत्य निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल.
- राजेंद्र गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक, पुणे लोहमार्ग पोलीस
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.