'ब्लॅक स्पॉट' ची महापालिकेकडून पाहणी ; सुरक्षा कक्ष सुरु केला जाणार
पुणे : पुण्यातल्या २१ ठिकाणांवर साक्षात यमराज दबा धरून बसले आहेत. पुणे महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे काही ठराविक ठिकाणांवर वारंवार अपघात घडत आहेत. त्यांची जंत्री पुणे पोलिसांनी तयार केली असून त्याठिकाणी झालेल्या गंभीर अपघातांच्या संख्येसह ही यादी ('ब्लॅक स्पॉट'ः पुणे महानगरपालिकेला पाठविण्यात आली होती. याठिकाणी उपाययोजना करून अपघात आणि वाहतूक कोंडीच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना पोलिसांनी पालिकेला केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने पाहणी केली असून अपघात कमी करण्यासह, शहरातील वाहतूकही सुरळीत करण्यासाठी सुरक्षा कक्ष (रोड सेफ्टी सेल) सुरू केला जाणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडलेल्या २०२० ते २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीतील अपघातांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये संबंधित 'ब्लॅक स्पॉट'च्या ५०० मीटर क्षेत्रामध्ये मागील तीन वर्षात घडलेल्या प्राणांतिक आपघातांची आकडेवारी काढण्यात आली आहे. या तीन वर्षात सलग पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर स्वरूपाचे अपघात घडलेले असतील, तसेच एकूण १० व्यक्ती (एका पेक्षा अधिक अपघात मिळून) मृत्यूमुखी पडलेल्या आहेत अशा ठिकाणांची ही यादी तयार करण्यात आली आहे. सर्वाधिक अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील नवले पूलाजवळ घडले आहेत. तर, त्या खालोखाल लोणी काळभोर आणि विमानतळ परिसराचा समावेश आहे.
भारती विद्यापीठ, कात्रज चौक, भारती विद्यापीठ, दरी पुल, भारती विद्यापीठ, नविन कात्रज बोगदा, वारजे माळवाडी-माई मंगेशकर हॉस्पीटल, वारजे माळवाडी- मुठा नदी पुल, वारजे माळवाडी - डुक्कर खिंड, सिंहगड रोड- नवले पुल, सिंहगड रोड - सेल्फी पॉईट, हडपसर - आयबीएम कंपनी, हडपसर - रविदर्शन चौक, लोणी काळभोर -कदमवाक वस्ती, लोणी काळभोर - लोणी स्टेशन चौक, लोणी काळभोर - थेऊर फाटा चौक, लोणी काळभोर - पालखी विसावा वडकी, चंदननगर - खराडी बायपास चौक, चंदननगर - रिलायंस मार्ट, विमानतळ - खराडी जकात नाका, विमानतळ - टाटा गार्डरुम चौक, विमानतळ - विमाननगर चौक, विमानतळ - ५०९ चौक, मुंढवा - मुंढवा रेल्वे पूल या ठिकाणांचा समावेश आहे.
या अपघातप्रवण म्हणून निष्पन्न झालेल्या २१ ठिकाणांची नव्याने निश्चिती करण्यात आलेली आहे. ही यादी वाहतुक पोलीस शाखेकडून पुणे महापालिकेला पाठविण्यात आली आहे. या सर्व सबंधित ब्लॅकस्पॉट ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सर्व ठिकाणांवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वाहतूक पोलिसांनी पालिकेला काळविले आहे. यासोबतच याठिकाणी केल्या जाणाऱ्या उपाययोजणांचा अहवाल वाहतूक शाखेला पाठवावा असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
रस्ता सुरक्षा कक्षाची जबाबदारी महापालिकेकडे...
महापालिकेने ब्लॅकस्पॉट ठिकाणांची पाहणी केल्यानंतर आता रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन्यात येणार आहे. या कक्षाच महापालिकेचे वाहतूक नियोजनकार, पथ विभाग, महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस तसेच पीएमपीच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच, या कक्षाची सगळी जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे.