मिळकत कर थकविलेल्या २०३ मिळकतींच्या लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात
पुणे : पुणे महानगरपालिकेने यंदा मिळकत कर वसूलीसाठी कंबर कसली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. १२७ कोटीं रुपयांची थकबाकी असलेल्या २०३४ मिळकती पालिकेने सील केल्या आहेत. तर त्यापैकी व्यावसायिक २०३ मिळकतींचा लिलाव केला जाणार असून लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.
महापालिकेकडून २०३ मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मिळकतदार न्यायालयात गेले आहेत. किंवा ज्या दाव्याचा निकाल देण्यात आला आहे परंतु वरच्या न्यायालयात पुन्हा अपील करण्यात आले आहे. त्यांच्या मिळकती ताब्यात घेताना कायदेशीर बाबींचा विचार करावा लागत आहे. विधी विभागाकडून त्यावर काम सुरु आहे. तर ज्या मिळकतींवर न्यायालयाची स्टे ऑर्डर नाही. त्या सील केल्या जात आहेत. यातील कायदेशीर अडचणींतुन मार्ग काढण्यासाठी पाच वकिलांची नियुक्ती केली गेली आहे.
मिळकत कर थकबाकी वसुलीकरीता मिळकत कर विभागाने प्रयत्न सुरु ठेवले आहे. गेल्यावर्षी काही निवासी मिळकती महापालिकेने सील करून त्यांचा लिलाव केला होता. यावर्षी महापालिकेने थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक मिळकतींवर लक्ष केंद्रीत केले आहे. आजपर्यंत सुमारे २ हजार ३४ व्यावसायिक मिळकतींकडे एकुण १२७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी २०३ मिळकतींचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया सुरु केली आहे. हा लिलाव करण्यासाठी महापालिकेला या मिळकतींवर बोजा चढवावा लागणार आहे. ही कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी महापालिकेच्या विधी सल्लागार विभागाचे पाच वकिल नियुक्त केले आहे. हे वकिल प्रत्येक प्रकरण तपासून प्रस्ताव तयार करून मिळकत कर विभागाला पाठवित आहेत.
महापालिकेला सदर मिळकतीचा लिलाव करायचा असल्यास त्या मिळकतीवर बोजा चढविणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टी कार्डच्या सीटीसर्व्हेनंबरवर थकबाकीदाराच्या नावाची नोंद हवी असते. ही तांत्रिक अडचण दुर करुन त्यातून मार्ग काढला जात आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्यास सुरुवात केल्यानंतर पहील्या टप्प्यात ८४ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या १८९ मिळकती सील केल्या गेल्या. दुसऱ्या टप्प्यात १० कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या ७९ मिळकती सील करण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून कर वसूली करण्यात येत आहे. आता पर्यंत १ हजार ५८० कोटी रुपये इतका मिळकत कर जमा झाला आहे. डिसेंबर अखेर हा १८०० कोटी रुपये थकबाकी असलेल्या मिळकतींच्या लिलावातून मिळालेली थकबाकीची रक्कम वसुल करून उर्वरीत रक्कम ही संबंधित मिळकतदाराला परत दिली जाणार आहे. मिळकतदार न्यायालयात गेले म्हणून कर वसूली किंवा कारवाई थांबणार नाही. ज्या मिळकतीच्या बाबतीत न्यायालयाची स्टे ऑर्डर नाही. त्या सील केल्या जाणार आहेत.
- अजित देशमुख, प्रमुख- कर संकलन आणि आकारणी विभाग, महापालिका.