Technology engineer : टेक्नोसॅव्ही अभियंत्यांच्या फसवणुकीत वाढ

अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाशी नित्य संबंध येणारा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारा वर्गही या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या मागील २० गुन्ह्यांचा आढावा घेतल्यावर त्यातील सर्व तक्रारदार हे उच्चशिक्षित असून, त्यांच्या जनजागृतीची वेळ पोलिसांवर आली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sun, 21 May 2023
  • 05:25 pm
टेक्नोसॅव्ही अभियंत्यांच्या फसवणुकीत वाढ

टेक्नोसॅव्ही अभियंत्यांच्या फसवणुकीत वाढ

तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत लोकांनाच सावधगिरीचे धडे देण्याची वेळ; महिनाभरात फसवणूक झालेले बहुतांश आयटी अभियंते

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाशी नित्य संबंध येणारा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारा वर्गही या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या मागील २० गुन्ह्यांचा आढावा घेतल्यावर त्यातील सर्व तक्रारदार हे उच्चशिक्षित असून, त्यांच्या जनजागृतीची वेळ पोलिसांवर आली आहे.

विवाहविषयक संकेतस्थळावरून लग्नाच्या बोलणीला सुरुवात करून, गिफ्ट पाठवताना ते कस्टमने पकडले असल्याचे सांगत ८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा नवा प्रकार पिंपळे-सौदागर येथील उच्चभ्रू अशा, कुणाल आयकॉन सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीसोबत घडला आहे. उच्च शिक्षित असणाऱ्या ३३ वर्षीय युवतीने फिर्याद दिली असून, लंडनस्थित निखील जोशी या युवकासह त्याच्या महिला साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयफोन, परदेशी चलन, सोने देण्याच्या आमिषाने या युवतीची ८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याचबरोबर कुणाल आयकॉन रोडवरील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीत राहणाऱ्या आणि हिंजवडीतील एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या ३९ वर्षीय महिलेलादेखील दीड लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी ‘मिशो ॲप’ वरील दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला मिशो ॲपवरील रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर ही रक्कम परत मिळवण्यासाठी पाठवण्यात आलेल्या एका वेब लिंकवर क्लिक केल्यावर या महिलेच्या बँक खात्यातून दीड लाख परस्पर काढून घेण्यात आले.

याशिवाय सध्या नोकरी किंवा 'पार्टटाइम' जॉबच्या नावाखाली गंडा घातला जात आहे. सध्या पोस्ट लाईक करा, रिव्ह्यू द्या अशा गोष्टी ऑनलाईन करायला लावून लाखो रुपयांना फसवण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. चिखली भागात राहणाऱ्या एका अभियंता महिलेला ६५ लाखांना गंडा घालण्यात आला आहे, तर एका मेकॅनिकल इंजिनिअर असणाऱ्या तरुणाला अशाच प्रकारे १९ लाखांना फसवले होते. गुगलवर लोकेशन रिव्ह्यूव देण्याच्या बहाण्याने वाकड परिसरात राहणाऱ्या एका प्रौढाची १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. बावधन, हिंजवडी, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, चिखली, निगडी प्राधिकरण, मोशी या भागात सध्या अभियंत्यांना गंडा घालण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.

कोरोना कालावधीत अनेकांनी 'वर्क फ्रॉम होम' करताना उरलेल्या वेळात अन्य नोकरी करून पैसे मिळतात का याची पडताळणी केली होती. अनेकांना अशा पद्धतीची कामे देखील मिळाली होती. परंतु, आता सायबर ठगांकडून याच पद्धतीचा फसवण्यासाठी वापर करून गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत. टेक्नोसॅव्ही असणाऱ्यांनाच टेक्नॉलॉजीचा वापर करून फसवले जात असून, सामान्य नागरिकांबरोबरच आता या उच्चशिक्षितांनाही फसवणुकीपासून बचाव करण्याचे धडे द्यावे लागत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest