शिवनेरी बसचे लोकार्पण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आज पुणे ते दादर, मुंबई अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सुरू केली आहे. यात एकूण पुणे डेपोला ५ आणि मुंबई डेपोला ५ अशा एकूण १० बसेसचा समावेश आहे. दोन्ही बस स्थानकातून दर तासाला या बसेस धावणार आहेत.
इलेक्ट्रीक शिवनेरी बसेस पुणे स्टेशनवरून औंध, निगडी मार्गे दादर, मुंबईला पोहचतील. यात दर तासाला एक बस अशा दिवसातून एकूण १५ फेऱ्या पुणे ते दादर, मुंबई होतील. तर दादरवरून दर तासाला अशा एकूण दिवसातून १५ फेऱ्या होतील.
यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना यासह इतर योजनांअंतर्गत सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येईल. तसेच प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी ई-बसमध्ये अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये एअर कंडिशनिंग, वायफाय कनेक्टिव्हिटी, आरामदायी आसनव्यवस्था, दोन स्क्रीन, प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट, प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र दिवे, स्वयंचलित दरवाजे आणि सुरक्षेसाठी सहा सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश आहे.