‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात; मुळा मुठा नदी किनारी शेकडो विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध गेम व अचानक आलेला रिमझिम पाऊस, यामुळे महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह द्विगुणीत झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 8 Sep 2023
  • 07:18 pm
Puneri Happy Youth Fest : ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात; मुळा मुठा नदी किनारी शेकडो विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात; मुळा मुठा नदी किनारी शेकडो विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

पुण्यातील मुळा मुठा नदीच्या किनारी शुक्रवारी (८ सप्टेंबर) रोजी पुणे महापालिकेने आयोजित केलेला ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात पार पडला. नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध गेम व अचानक आलेला रिमझिम पाऊस, यामुळे महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह द्विगुणीत झाला. यावेळी ‘माझ पुणे, आम्ही पुणेरी’ अशा घोषणांनी परिसर दुमदूमला होता. रिल्स स्टार अथर्व सुदामे हा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मचाले यांच्यासह महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळ ३०० मीटरचा सॅम्पल स्ट्रेच तयार करण्यात आला आहे. हा सॅम्पल स्ट्रेच नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला असून सर्वात प्रथम तो महाविद्यालयीन तरुणांना पाहता यावा, या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या वतीने ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’चे आयोजन शुक्रवारी सकाळी ७ ते सकाळी १० यावेळेत सॅम्पल स्ट्रेचवर करण्यात आले होते. या फेस्टला महाविद्यालयीन तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

'पुणेरी हॅपी यूथ फेस्ट'मध्ये सुरुवातीला महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पाचे उद्देश, प्रकल्पाचे नागरिकांना होणारे फायदे आदींबाबत सविस्तर माहिती दिली. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी माहिती घेण्यासोबतच विद्यार्थ्यांनी याठिकाणी विविध खेळांचा आनंद घेतला. याप्रसंगी विविध गाण्यांवर महाविद्यालयीन तरुणाई येथे थिरकताना दिसली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनीही विविध खेळांमध्ये सहभागी होत तरुणाईचा उत्साह वाढवला. यावेळी सॅम्पल स्ट्रेचवर सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. मुळा मुठा नदी किनारी करण्यात आलेला सॅम्पल स्ट्रेच पाहून अनेकांनी अशा प्रकारे नदीचा किनारा हा सर्वत्र व्हावा, अशा भावनाही व्यक्त केल्या. तसेच अनेकांना या सॅम्पल स्ट्रेचचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचा मोह आवरता आला नाही.

म्हणून आयोजित केला होता विशेष कार्यक्रम

मुळा मुठा नदी किनारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना देखील यावेळी महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली. मुळा मुठा नदीचा किनारा किती सुंदर दिसू शकतो, महापालिका यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत, हे विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे यावेळी सांगण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थी व नदी यांच्यातील नाते अधिकच दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी याप्रसंगी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी काळात नागरिकांसाठी अशाच पद्धतीने नदी किनारी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशीही माहिती दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest