फिलिपिन्समधील वैद्यकीय शिक्षण संकटात, २५ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिलिपिन्समधील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) बीएस तसेच एमडीच्या वैद्यकीय शिक्षणाला अमान्य ठरवले आहे. त्यामुळे सुमारे २५ हजार भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोडावा लागण्याची भीती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनने अध्यादेश राजपत्र प्रसिद्ध करीत या अभ्यासक्रमाला अमान्य ठरविले आहे. या शिक्षणात विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पकडून साडेपाच वर्षांचे शिक्षण पूर्ण होते. अध्यादेश प्रसिद्ध होण्यापूर्वीपर्यंत या शिक्षणाला एनएमसीची मान्यता होती. अध्यादेशामध्ये २०२०-२१ आणि २०२१- २२ या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही नियम लागू केला आहे. शैक्षणिक व आर्थिक नुकसान वाचवण्यासाठी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी हजारो पालक व विद्यार्थ्यांनी केली.
भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्याचबरोबर खासगी महाविद्यालयाचे शुल्कही भरमसाठ आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी रशिया, युक्रेन, उझबेकिस्थान, व्हिएतनाम आदी देशांत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतात. फिलिपिन्समधील मान्यताप्राप्त कॉलेजांमध्ये कमी शुल्कात बीएस- एमडीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. या पद्धतीने शिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतीय - विद्यार्थ्यांना देशात परतल्यानंतर दीड वर्षाची पुन्हा इंटर्नशिप करावी लागणार आहे. त्याचवेळी एमएनसीने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून सूट दिली आहे.
एनएमसीने म्हटले आहे की बीएस आणि एमडी अभ्यासक्रमाच्या फिलिपिन्समध्ये दोन स्वतंत्र पदव्या आहेत. बीएस अभ्यासक्रम एमबीबीएस अभ्यासक्रमाशी समतुल्य होऊ शकत नाही. त्यामुळे भारतातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या समतुल्य नसलेल्या कोणत्याही परदेशी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आधीच प्रवेश मिळाला आहे म्हणून त्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी नोंदणीसाठीची पात्रता मानली जाऊ शकत नाही. फिलिपिन्समध्ये विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बीएस हा विज्ञान शाखेचा एक ब्रिजिंग कोर्स आहे, त्यात भारतातील अकरावी आणि बारावीच्या वर्गांप्रमाणेच जीवशास्त्र विषयांचा समावेश आहे.
पालक प्रतिनिधी गीता जैन म्हणाल्या, "मुलाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आम्ही ३० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले आहे. मात्र, अचानक ही पदवी अमान्य केल्याने शैक्षक्षिक आणि आर्थिक नुकसान होणार आहे. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील किमान ५ हजार विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. "
शिक्षण सल्लागार महेंद्र सुरवसे म्हणाले, "एनएमसीच्या सूचनेनुसार बीएस कोर्स हा फिलिपिन्समधील प्री-मेडिकल कोर्स आहे. तो पूर्ण केल्यानंतर एमडीला प्रवेश घेण्यासाठी एनएमएटी या परीक्षेला बसावे लागेल. हा अभ्यासक्रम एमबीबीएसच्या समतुल्य असून चार वर्षांचा आहे. बीएस अभ्यासक्रम आणि त्यानंतर एमडी अभ्यासक्रम असा पॅटर्न आहे. मात्र, बीएस अभ्यासक्रमात उमेदवारांना शरीरशास्त्रासारखे प्री- क्लिनिकल विषय शिकवले जात नाहीत. बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, जीवशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी विषय शिकवले जात आहेत. भारतातील बारावी इयत्तेच्या समतुल्य हे विषय आहेत. "
"नॅशनल मेडिकल कमिशन नियामक प्राधिकरण असल्याने भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रणालीची गुणवत्ता सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. ज्यांना वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून देते. वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या उच्च दर्जाशी आणि गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी वेळ वाया घालवू नये. त्यांनी लवकरात लवकर पुढील शिक्षणासाठी पर्याय शोधावा,” असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ हरीश बुटले यांनी दिला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.