संग्रहित छायाचित्र
विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा (Pune News )ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण (Noise pollution)केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे पोलिसांनी विमानतळ, चंदननगर, कोथरूड येरवडा, हडपसर आणि वानवडी भागातील मंडळे तसेच ध्वनियंत्रणा पुरवठादारांवर ही कारवाई केली. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे ७० ते ८० प्रकरणे ध्वनिमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) पाठविण्यात आले होते.
याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली. २०१८ मध्ये गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे ६४ तर २०१९ मध्ये १६ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ५५ डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४५ डेसिबल अशी ध्वनीमर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे देखील निर्देश आहेत. मात्र विसर्जन मिरवणुकीत सुमारे १३० डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.