हडपसरमध्ये मराठा समाज उतरला रस्त्यावर, गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत ओबीसीमधील आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज पुण्यातील हडपसर भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले आहेत. आंदोलकांनी जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत लवकरात लवकर राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.
हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “या लोकशाही प्रत्येकाला शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याचा अधिकार आहे. असा अधिकार असताना अशाच पद्धतीने त्या ठिकाणी जालन्यामध्ये देखील मराठा समाज आंदोलन करत होता.”
“या आंदोलनादरम्यान अतिशय भ्याडपणे या आंदोलकांवर हल्ला करण्यात आला होता. हा घडलेला सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे आणि याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण हडपसरच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत”, असेही तुपे म्हणाले.