संग्रहित छायाचित्र
पुणे, ०६ - भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून या संविधानाची मूल्ये जाणणे व ती आचरणात आणणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व रासेयो आणि बीओडी यांच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. (डॉ.) सुधाकर जाधवर, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती चारूशिला गायके, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विजय खरे, प्रा. (डॉ) प्रभाकर देसाई, अधिसभा सदस्य प्रा. (डॉ.) राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, प्रा. (डॉ.) राधाकृष्ण पंडित आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आदरांजली वाहिली. याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात विशेष व्याख्यानासाठी आमंत्रित प्रमुख वक्ते प्रा. (डॉ.) सुधाकर जाधवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन आणि भारतीय समाज या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आणि घटनांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय समाजाबद्दल बाबासाहेबांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. याप्रसंगी उपस्थितांनी बुद्धवंदनेने बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीओडीचे संचालक प्रा. (डॉ.) अभिजित कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.बोकेफोडे यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.