Pune by-election
भाजप खासदार गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिला तर पोटनिवडणूक लढवेन, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्ता केली होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांसमोर बोलताना प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे विधान केले होते. त्यातच आता आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रुपाली पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
रुपाली पाटील म्हणाल्या की, “कसब्याच्या पोटनिवडणूकीवेळी कसबा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या अशी मी मागणी केली होती. आता पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. कुठलीही पोटनिवड़णूक ही दुर्दैवी असते. कारण एखाद्या आमदाराचे, खासदाराचे निधन झाल्यावर ती पोटनिवडणूक होत असते. परंतू, महाविकास आघाडीने नवीन फॉर्मुला तयार केला पाहिजे.”
“या संदर्भात मी वरिष्ठा नेत्यांकडे मागणी केली आहे की पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, त्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतली. पुण्यात कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवणार आहे. पक्ष माझ्यावर जी जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल, जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, पक्षाचे आदेश मी प्रामाणिक आणि खामक्यापणाने पार पाडेल अशा शब्द मी पक्षाला दिला आहे, त्यामुळे आता पक्षाच्या आदेशाची वाट पाहत आहे”, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.