संग्रहित छायाचित्र
पुण्यात २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १ लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या दाव्यांतून ३९६ कोटी २ लाख ९९ हजार २०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
याबाबत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी माहिती दिली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दाखलपूर्व स्वरूपाचे दोन लाख १६ हजार ८६ दावे लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७९ हजार ९५६ दावे निकाली काढण्यात आले. त्यातून ७६ कोटी २१ लाख ९४ हजार २५३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. ७२ हजार ४७७ प्रलंबित प्रकरणांमधून ३० हजार २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ३१९ कोटी ८१ लाख ४ हजार ९४७ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तसेच दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी १३३ पॅनेल नियुक्त करण्यात आले होते.
वेगवेगळ्या दाव्यांमध्ये बँकेच्या कर्जवसुली ३ हजार ५५२ दावे निकाली काढण्यात आले आहेत. तर तडजोड पात्र फौजदारी गुन्हे २९ हजार ३८५, वीज देयक १५७, कामगार विवाद खटले ७१, भूसंपादन १०३, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १४६, वैवाहिक विवाद २८५, धनादेश न वटणे २ हजार २१२, अन्य दिवाणी दावे ९२४, पाणी कर ६८ हजार १८०, ग्राहक विवाद १८ आणि अन्य दावे ५ हजार १८६ असे एकूण १ लाख १० हजार १९२ दावे निकाली काढण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.