हिमाचल प्रदेशात पावसाचे तांडव, पुण्यातील १७ नागरिक पुरात अडकले
उत्तरेकडील राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु असून पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच गेल्या दोन दिवसात पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले आहे. या १७ पैकी मंगळवारी १० व्यक्तींचा संपर्क झाला आहे. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. मात्र, उर्वरित ७ पर्यटकांचा अद्यापही संपर्क होत नाही.
उत्तर भारतातील अनेक भागांत पावसाने कहर केला असून मोठमोठे रस्ते, वाहने, इमारती, पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील व्यास नदीला मोठा पूर आला असून येथील ५० वर्षे जुना असलेला पूल वाहून गेला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील काही नागरिक हिमाचल प्रदेश राज्यात पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, ४ ते ९ जुलैपर्यंत चंदीगढ ते हिमालच प्रदेशातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या १७ व्यक्तींचा संपर्क होत नाही.
सोमवार आणि मंगळवारपर्यंत यातील दहा व्यक्तींचा संपर्क झाला आहे. सध्या ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दिली. मात्र, उर्वरित सात व्यक्तींशी संपर्क होत नसल्याने याबाबतची माहिती राज्य शासनाला देण्यात आली आहेत. राज्य शासन हिमाचल प्रदेशातील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.