पुण्यातील घाट परिसरात दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी
पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील घाट भागात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ आणि २७ जुलै रोजी घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडेल. तर २८ आणि २९ जुलैला घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, संपूर्ण किनारपट्टीसह, घाटमाथा, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.