ऐन दिवाळीत पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले
पुणे: ऐन दिवाळीत शहरासह उपनगर भागाला शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाने (Rain) झोडपले. सहा वाजेपर्यंत एक मिलीमीटर पावसांची नोंद झाली. एका तासात पडलेल्या पावसाने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (Pune News)
शहरात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजता पुण्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला. कोथरूड, धायरी, बिबवेवाडी, आंबेगाव, कोंढवा, येवलेवाडी धनकवडी, पद्मावती, सिंहगड रस्ता, शिवाजी नगर, विद्यापीठ परिसर, बाणेर रोड, औंध, पाषाण या भागामध्ये या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाट काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
पावसाने निरोप घेऊन आता महिना उलटला आहे. ऑक्टोंबर हिटमुळे नागरिकांना गरमीचा चांगलाच सामना करावा लागत होता. त्यात अचानक पावसाने हजेरी लावली. हवामान झालेल्या बदलाचा नागरिकांचा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे पुण्यातील थंडी गायब झाली होती. तसे पाहिले तर शहरात थंडीची चाहूल नवरात्रीपासूनच लागते. दसऱ्यापर्यंत सकाळी गवतावर दव दिसू लागते. पहाट धुक्याची दुलई पांघरू लागते. दिवाळी संपता संपता बऱ्या पैकी गुलाब थंडीचा मौसम आलेला असतो. मात्र मध्येच आता पावसाने हजेर लावली आहे.
रेनकोट की स्वेटर्स वापरावे..?
थंडीची चाहूल लागल्याने अनेकांनी स्वेटर्स, ब्लॅकेट, शाल असे गरम कपडे बाहेर काढले होते. थंडी देखील चांगली पडायला सुरवात झाली होती. मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे रेनकोट वापरावा की स्वेटर्स वापरावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक त्रासले...
रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त वाहनचालक यामुळे शहरात नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात पावसाच्या हजेरीमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. तसेच नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झालेली दिसून आली.
पावलामुळे सीमाभिंत पडली....
शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे बालाजी नगर, राम मंदिराजवळील सदगुरू सोसायटीची (नाल्यालगतची सीमाभिंत पडली. यामुळे भिंती लगत पार्किंग केलेली चारचाकी वाहनाचे नुकसान. दरम्यान यामध्ये कोणाही जखमी झाले नाही. घटेनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. शहरात रस्त्यांवर पाणी साचल्या शिवाय इतर कोणत्याही गंभीर घटना घडल्या नसल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले.