कलम १४४ लागू
पुण्यातील मांजरी खुर्द, भावडी ग्रामपंचायत आणि बकोरी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि. १८) मतदान पार पडणार आहे. यासाठी १८ एप्रिलपासून निकाल लागेपर्यंत या परिसरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच १८ मेपासून मतमोजणीपर्यंत बुथ परिसरातील १०० मिटरच्या अंतरापर्यंत कमल १४४ लागू करण्यात आले आहे.
पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील बूथ क्रमांक १ व बुथ क्रमांक २, भावडी ग्रामपंचायत हद्दीतील जि.प. प्राथमिक शाळा व बकोरी ग्रामपंचायत हद्दीतील जि.प. प्राथमिक शाळा या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी आज (दि. १८) मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी सदर मतदान केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसराच्या जागेचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे या मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व व्यावसायीक दुकाने, रेस्टॉरंट, टपऱ्या, (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्व आस्थापना बंद ठेवाण्यात येणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेश दिले आहेत.