Pune News : पुणेकरांसाठी महत्वाचं! एका क्लिकवर मिळवा आता नवा नळजोड!; 'या' दिवशी ऑनलाईन सुविधा होणार सुरु

महापालिकेकडून नळजोड घेण्यासाठी आता कोणाच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. कारण महापालिकेने इतर ऑनलाईन सुविधांप्रमाणे नळजोडही ऑनलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 13 Oct 2023
  • 03:15 pm

संग्रहित छायाचित्र

सोमवारपासून संकेतस्थळावर करा अर्ज; सात दिवसांत मिळेल ऑनलाईन नळजोड

अमोल अवचिते 
महापालिकेकडून नळजोड घेण्यासाठी (Pune News) आता कोणाच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. कारण महापालिकेने (PMC) इतर ऑनलाईन सुविधांप्रमाणे  (Online facilities)नळजोडही ऑनलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर नळजोड घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. ही ऑनलाईन सुविधा १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमधून नवीन नळजोड हवा असल्यास परवानगी काढावी लागते. विनापरवाना नळजोड घेतल्यास पालिकेकडून थेट नळजोड तोडण्याची कारवाई केली जाते. त्यामुळे परवानगी घेऊन नळजोड घेण्यासाठी नागरिक प्रयत्न करतात. मात्र परवानगी कशी काढावी, कोणाकडे अर्ज करावा याबाबत नागरिकांमध्ये माहितीचा अभाव असतो. तसेच सरकारी कार्यालयात चकरा मारण्यापेक्षा मध्यस्थाच्या माध्यमातून नळजोड घेतला जाण्याला प्राधान्य दिले जाते. यामध्ये नागरिकांसह पालिकेला देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. तसेच नळजोडसाठी २० ते २५ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारी देखील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात येत होत्या. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी विभागाकडून विचार करण्यात येत होता. त्यानुसार पालिकेने आता नळजोडणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सात दिवसांच्या आत पाणी पुरवठा विभागाकडून नळजोड देण्यात येणार आहे.

प्लंबरमार्फत स्वीकारला जाणार अर्ज  

नागरिकांना ऑनलाईन नळजोडणीसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली असली तरी थेट संकेतस्थळावर अर्ज करता येणार नाही. त्यासाठी महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या प्लंबरच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पालिकेकडे  ५०० हून अधिक प्लंबरनी अधिकृत नोंदणी केली आहे. त्यांच्या मार्फत अर्ज केल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये काही तृटी असतील किंवा वाद असतील तर ते त्या त्यावेळीच सोडविण्यात येणार आहेत. तसेच अर्जाची स्थिती देखील समजणार आहे. मेसेजच्या माध्यमातून अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे. याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे अर्जदार आणि प्लंबर यांना एकाच वेळी ही माहिती उपलब्ध होणार आहे.  यासोबतच नळजोडणीसाठी नियमानुसार आकारण्यात येणारे शुल्क ऑनलाईन पध्दतीने तसेच चलनाद्वारे भरता येणार आहे. या ऑनलाईन प्रणालीमुळे नळजोडणी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

असा करता येणार अर्ज

महापालिकेच्या  https://pmc.gov.in/या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सेवा अधिकार अधिनियम (राईट टू सर्व्हिस) यावर क्लिक केल्यानंतर नळजोडसाठी अर्ज उपलब्ध होईल. त्यावर सविस्तर माहिती भरून जमा करावी. त्यानंतर सर्व बाबींची तपासणी करून सात दिवसात नळजोड दिला जाणार आहे.

महापालिकेने नळडजोडणी प्रक्रिया सुलभ केली आहे. ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याने नागरिकांना नळजोड घेण्यास काही अडचणी येणार नाहीत. यामुळे मध्यस्थांच्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक आता होणार नाही.

 - अनिरुध्द पावसकर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, महापालिका.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest