बीटी कवडे रस्ता ते एम्प्रेस गार्डन दरम्यानच्या कॅनॉलच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य
पुणे: शहरासह उपनगर भागात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. नागरिकांनी रस्त्यावर आणि वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकू नये असे आवाहन महापालिकेकडून (PMC) केले जात आहे. मात्र याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बीटी कवडे रस्ता ते एम्प्रेस गार्डन दरम्यानच्या कॅनॉलमध्ये सध्या पाणी नाही. मात्र पाण्यापेक्षा कचऱ्याचे साम्राज्य अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. (Pune News)
बीटी कवडे मुख्य रस्त्यावरुन कॅनॉलच्या बाजूच्या रस्त्याने एम्प्रेस गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याला जाता येते. या रस्त्याने पुणे स्टेशन, तसेच कोंढवा, हडपसर रस्त्याला जाता येते. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकांची संख्या अधिक असते. रस्त्याच्या एका बाजूला कॅनॉलचे पात्र तर दुसऱ्या बाजूला झाडे झुडपे आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांकडून तसेच या परिसरातील स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. तसेच कॅनॉलच्या पात्रात देखील कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच वाहत्या पाण्यात सोबत आलेला कचरा पुलाखाली अडकला आहे. त्यामुळे कॅनॉलच्या पात्रातील कचरा महापालिकेने साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात या कॅनॉलच्या पात्रात छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजेच्या निमित्ताने नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती.पूजेसाठी नागरिकांची गर्दी होणार असल्याने व्यवस्थापकांनी चांगली नियोजन केले होते. मात्र पूजेनंतर पूजेचे साहित्य, मुर्ती तशीच पात्रात पडून असल्याचे दिसून येत आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर साहित्य उचलून ते पु्न्हा एकत्रित संकलित करणे आपेक्षित होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच महापालिकेकडून देखील येथे स्वच्छता राबविण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
कॅनॉलच्या रस्त्याने दररोज प्रवास करतो. हा रस्ता एक आडबाजूला असल्याने नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. रस्त्यावर तसेच कॅनॉलच्या पात्रात कचरा टाकू नका असे अनेक नागिरकांना सांगण्यात असतो. मात्र कोणी ऐकत नाही. महापालिकेनेच येथे साफसफाई करुन कचऱ्या टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
- प्रसन्न चव्हाण, नागरिक.
या रस्त्याकडे महापालिकेच्या लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळात तक्रार करुन सुध्दा येथील कचरा उचलला जात नाही. या रस्त्याचा भाग स्वच्छ ठेवण्यात यावा. तसेच किरकोळ विक्रेत्या मोठ्या संख्येन बसतात, ते देखील त्यांचा निर्माण झालेला कचरा कॅनॉलच्या पात्रात टाकताना दिसून आले आहेत. महापालिकेन दंडात्मक कारवाई करावी.
- राजेश पाटील, नागरिक.
कचरा रस्त्यावर टाकू नये, वाहत्या पाण्यात निर्माल्य फेकू नयेत. असे आवाहन सातत्याने केले जात आहे. कॅनॉलच्या पात्रातील तसेच पुलाखाली अडकलेला कचार काढण्यात येईल. संबंधित क्षेत्रिय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत आहे.
- संदीप कदम, प्रमुख घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.