‘स्वच्छ’ गणेशोत्सवासाठी कचरा वेचक सज्ज
पुण्याचा गणेशोत्सव ‘स्वच्छ’ व्हावा आणि संस्कृतीसोबत निसर्गाचेही संवर्धन व्हावे या हेतूने मागील १५ वर्षांपासून पुण्याच्या सर्व प्रमुख विसर्जन घाटांवर स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक निर्माल्य संकलन उपक्रम राबवत आहेत. यावर्षी २३ व २८ सप्टेंबर रोजी शहरभरातील २०० हून अधिक कचरा वेचक ४० वेगवेगळ्या विसर्जन घाटांवर निर्माल्य निसर्गाकडे पर्यावरण पूरक पद्धतीने परत पाठवण्यासाठी सज्ज असणार आहेत.
२००७ पासून सुरु असलेल्या या उपक्रमातून दरवर्षी अंदाजे १०० टनांहून अधिक निर्माल्य गणपती विसर्जनादरम्यान खतनिर्मितीसाठी कचरा वेचक वेगळे गोळा करतात. फुले, पाने, दुर्वा इ. निर्माल्य पूजेनंतर कचऱ्यात किंवा नदीमध्ये न जाऊ देता पुणे महानगरपालिकेतर्फे खतनिर्मितीसाठी पाठवले जाते. यातून कोणाच्याही धार्मिक भावना न दुखवता, उत्सवाची संस्कृती जपत, पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक पुणे मनपा सोबत करत आहेत. कचरा वेचक आणि नागरिक यांचे घट्ट नाते देखील या उपक्रमातून तयार झाले आहे. दररोज शहरातील प्रत्येक दारातून कचरा घेणाऱ्या कचरा वेचक महिला शहरातील सर्वात मोठ्या उत्सवात देखील शहराच्या स्वच्छतेसाठी उभ्या राहतात.
याविषयी स्वच्छ। संस्थेच्या बोर्ड मेंबर विद्या नाईकनवरे म्हणाल्या, 'आम्ही कचरा घ्यायला गेलो की आता नागरिक आम्हाला त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला बोलवतात, प्रसाद देतात. आम्ही आमच्या स्वच्छ संस्थेद्वारे अशी आमची माणूस म्हणून ओळख शहरात निर्माण केली आहे. आम्ही जर सण आहे म्हणून सुट्टी घेतली तर पूर्ण शहरात ऐन उत्सवादरम्यान कचऱ्याचे ढीग होतील. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच आम्ही निर्माल्य संकलनाचा उपक्रम गेली १५ वर्ष राबवत आहोत. यावर्षी देखील आम्ही नागरिकांना आवाहन करतो की विसर्जन घाटांवर किंवा केंद्रांवर निर्माल्य कचरा वेचकांकडे वेगळे द्या, त्यामध्ये इतर कोणताही कचरा मिसळू देऊ नका. आपल्या पुण्याचे पर्यावरण आणि संस्कृती नागरिकांच्या साथीने जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.'
२३ व २८ सप्टेंबर रोजी स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक ४० ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी निर्माल्य शहरात इतरत्र, पुलांवर किंवा कोणत्याही जलप्रवाहात न टाकता स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांकडे दयावे असे आवाहन स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.