पुणे जिल्ह्यात एका महिन्यात चौघा सर्पमित्रांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात वारंवार सर्पदंशाच्या घटना घडून काही नागरिकांचा मृत्यू होत आहेत. नुकतेच पुणे जिल्ह्यातील चौघा सर्पमित्रांना सर्पदंश झाला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघांना जीवनदान मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्पमित्रांना दंश होत असल्याने नागरिक भयभीत होत असून सर्पमित्रांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सर्पमित्र विजय यादव यांना १५ ऑगस्ट रोजी विषारी नागाचा दंश झाला होता. मात्र, उपचारादरम्यान ४ दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितील शेलकर याला विषारी नागाचा दंश झाला. मात्र त्याच्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा झाला. सदर घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा वन्यजीव सर्परक्षक असोशियनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यांना विषारी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या तिघा सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना ताज्या असतानाच शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांना शिक्रापूर येथे साप पकडताना अतिविषारी घोणस जातीच्या सापाचा दंश झाला. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, सदर दंश झालेले चारही सर्पमित्र कोणतीही सुरक्षितता न बाळगता साप पकडण्याचे काम करत होते. तर सर्पदंश झालेल्या चौघांपैकी गणेश टिळेकर याला यापूर्वी ३ वेळा सर्पदंश झालेला असून देखील कोणत्याही सुरक्षिततेविना मोठ्या आत्मविश्वासाने साप पकडले. आज सर्पमित्राच्या अंगलट आलेले असून अशा सर्पमित्रांवर वनविभाग वचक ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता तरी वनविभागाने सर्पमित्रांना समाज देऊन सुरक्षितता बाळगण्याबाबत समज देणे गरजेचे आहे.
याबाबत सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे म्हणाले की, “सर्प पकडण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, तसेच सर्प पकडण्यासाठी स्टिकचा वापर करावा, त्या सर्पाबाबत किंवा प्राण्याबाबत आपण रिस्पेक्ट देणे गरजेचे आहे, तसेच या पकडलेल्या सापा बाबत जनजागृती करावी, साप पकडल्यानंतर तो लोकांना हातळून दाखवू नये. विशेषतः सर्प पकडण्यासाठी जाताना तोंडात गुटखा नशा पाणी न करता जावे यामुळे सर्प पकडणाऱ्या व्यक्तीचे मनेविचलित होतात व दुर्घटना घडतात.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.