भिडे वाडा स्मारकासाठी महापालिकेकडे चार आराखडे सादर
पुणे: भिडे वाड्याची (Bhide Wada) जागा ताब्यात मिळाल्याने या जागेवर आता राष्ट्रीय स्मारक (National Monument) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारक कसे असावे याबाबत महापालिकेकडून चार वास्तूविशारदांकडून (आर्कीटेक) आराखडे सादर करण्यात आले आहे. तसेच आणखी आरखडे येण्याची शक्यता गृहीत धरून त्यानंतर महापालिकेच्या (PMC) वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे त्याचे सादरीकरण केले जाणार आहे. असे महापालिकेच्या भवन विभागाने सांगितले.
भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता जागा ताब्यात आल्याने पुढील कार्यवाही सुरु केली जाणार आहे. स्मारक कसे असेल याची उत्सुकता देखील पुणेकरांना लागली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक उभारताना फुले दाम्पत्याच्या जीवन कार्याचा इतिहास देशालाच नव्हे तर जगाला कळावा, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे स्मारक उभारताना बारकाईने विचार केला जाणार आहे.
भिडे वाडा स्मारकाच्या आराखड्यानुसार स्मारकाचा लूक हेरिटेज असणार असून स्मारकात म्युझियम, ग्रथांलय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, शाळा भरण्याचे ठिकाण आदी ऐतिहासिक आठवणींना आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आराखड्यांमध्ये गरजेनुसार सुधारणा करून एक आराखडा लवकर अंतिम करण्यात येणार आहे. सर्व आराखड्यांचे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांच्यासमोर सादरीकरण केले जाईल. वरिष्ठांच्या सूचनांनूसार आवश्यक ते बदल करून यापैकी एक आराखडा अंतिम केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
भिडे वाड्याची जागा सुमारे ३२७ स्क्वेअर मीटर...
महापालिकेने भुसंपादन केलेली भिडे वाड्याची जागा सुमारे ३२७ स्क्वेअर मीटर इतकी आहे. या स्मारकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, वर्गखोलीत मुलींना शिकविताना सावित्रीबाई फुले, स्मारकाला हेरिटेज लूक, म्युझियम, ग्रथांलय, ५० ते ६० आसन व्यवस्थेचा बहुद्देशीय हॉल, प्रत्येक मजल्यावर महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, माहिती दर्शक फलक, हा तीन दुमजली आणि आधुनेकतेची सांगड घालत जुन्या रुपात उभारण्यात येणार असून छत हे कौलारू असेल. अशा पद्धतीनेच महापालिकेने हे प्राथमिक संकल्पचित्र तयार करून घेतले आहे. हे संकल्पचित्र असून वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि त्यात आवश्यक बदल करूनच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. स्मारकाला सुमारे १० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. तसेच आराखडा मान्य केल्यानंतर त्यासाठी खर्चाची तरतूद केली जाणार आहे.