संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या जुलैमध्ये ११० वर पोहोचली आहे. त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद या महिन्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या वर्षी महापालिकेने पाहणी करून आतापर्यंत शहरातील ५४७ जणांना डेंग्यूच्या डास उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.
याबाबत माहिती देताना महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले की, एप्रिल ते जून या कालावधीत डेंग्यूचे निदान झालेला एकही रुग्ण सापडला नव्हता. मे महिन्यात डेंग्यूचे २७ संशयित रुग्ण होते. जून महिन्यात त्यांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. आता जुलैमध्ये ही संशयित रुग्णांची संख्या ११० झाली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे.
जुलै महिन्यात डेंग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात प्रथमच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. याच वेळी चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत वर्षभरात चिकुनगुन्याचे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत. खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध सोसायट्या, हॉटेल, अन्य आस्थापना यांच्या मोकळ्या जागेत पाणी साचते का, याची पाहणी केली जात आहे. डेंग्यूचे डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्यास दंड ठोठावला जात आहे, अशीही माहिती डॉ. देवकर यांनी दिली आहे.
दरम्यान, कूलर, फ्रीज यातील पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. घराच्या टेरेसवर व परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करणयात आले आहे. तसेच आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय पातळीवर स्वतंत्र तपासणी पथक तयार केले आहे. याद्वारे नित्याने विविध सोसायट्या, आस्थापना यांची पाहणी करून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.