संग्रहित छायाचित्र
खराडीतील एका शाळेची स्कूल बस १५ ते २० विद्यार्थ्यांना शाळेतून घरी निघाली होती. बस चालकाला बोनेटमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ बस बाजूला घेत तपासणी केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखून बसचालकाने बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना तेथ जमलेल्या नागरिकांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढले.
खराडी भागातील तुळजा भवानी नगर परिसरात असलेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेल्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी २ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. या बसमध्ये १५ ते २० विद्यार्थी प्रवास करत होते. आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान धूर वाढतच होता अचानक बसने पेट घेतला. काही क्षणात बस जळून खाक झाली. विद्यार्थ्यांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यास यश आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच येरवड्यातील अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच बी टी कवडे, घोरपडी येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. कालकथित दयानंद सोनकांबळे अग्निशमन केंद्र बी. टी. कवडे रोड, घोरपडी आणि येरवडा अग्निशमन केंद्राचे तांडेल संदीप रणदिवे, बजरंग लोखंडे, हितेश पाटील, अक्षय राऊत, फायरमन सुभाष नरके, प्रणय कवडे, शंतनू कोकणे, हृषिकेश पवार, मदतनीस फायरमन गौरव कांबळे, अमित वाघ, विशाल गायकवाड यांनी कर्तव्य बजावले.
महापालिका अग्निशमन दलाच्या या केंद्रातील अग्निशमन दलाच्या वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. फोनिक्स वर्ल्ड स्कूलची ही बस होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
चालत्या वाहनांनी आग लागण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे वाहनचालकांचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात जातो. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.