संग्रहित छायाचित्र
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक वाहनचालकांवरील दंड थकीत आहेत. त्यामुळे अनेकांवर खटले देखील दाखल झाले आहेत. मात्र, आता थकित दंड प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांकडून मदत केंद्र सोमवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू करण्यात येणार आहे. वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांकडून दंडाचे चलन मोबाईलवर पाठवले जाते. त्यानंतर दंडाची रक्कम वसुल केली जाते. मात्र, जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये वाहतूक चलनांचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी नागरिकांच्या वाहनांवरील दंडाच्या रक्कमेत तडजोडीअंती सूट दिली जाणार आहे. ज्या वाहनांवर प्रलंबित केसेस आहेत, अशा वाहन चालक, मालक यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यायात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालकांवरील प्रलंबित दंडाची रक्कम तडजोडीनंतर वाहन चालकांवरील दंड चलन कमी केले जाईल. वाहनचालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन तडजोडीत दंड कमी करुन घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.