खड्डे बुजवा, अन्यथा कारवाई...
मागील आठवड्यात झोलेल्या दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच हे खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावादेखील उघडा पडला आहे. आता महापालिने (PMC) हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना येत्या शनिवारची (दि. ७) डेडलाईन दिली आहे. तोपर्यंत खड्डे बुजवण्यात न आल्यास कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे(Vikash Dhakane) यांनी दिला आहे.
शहरात पावसाने गेल्या आठ दिवसात दमदार हजेरी लावली. त्यात पालिकेने बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता खड्ड्यांचे पुन्हा एकदा साम्राज्य दिसू लागले आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वीच शहरासह उपनगर भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र पुन्हा पावसाने दणका दिल्याने महापालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली. त्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या कामांवर संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर महापालिकेकडून खड्डे बुजविण्याच्या कामाला वेगाने सुरवात झाली आहे. शनिवारपर्यंत खड्डे बुजवण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. अन्यथा ९ ऑक्टोबरपासून संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहने चालवताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रासले असून महापालिकेला रस्त्यांवर पडलेले खड्डे आवडत आहेत का? खड्डे काय नागरिकांचा जीव घेण्यासाठी ठेवले आहेत का? असे संतापजनक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत ‘सीविक मिरर’ने २ ऑक्टोबर रोजी ‘आता पडला खड्ड्यांचा पाऊस!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर पालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही रस्त्यावर अनेक खड्डे असल्याने ते बुजविण्यास वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ढाकणे यांनी बुधवारी (दि. ४) थेट रस्त्यावर उतरुन खड्ड्यांची पाहणी केली.
ढाकणे यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी सिंहगड रस्ता, नगर रस्ता, वडगावशेरी, ढोले पाटील, भवानी पेठ आणि विश्राम बाग या भागातील रस्ते तसेच सोलापूर रस्ता, खराडी बायपास (मगरपट्टा रस्ता) आदी रस्त्यांची पाहणी केली.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे. खड्ड्यांचा आकार मोठा असल्याने जीव मुठीत धरुन वाहनचालकांना वाहन चालवावे लागत आहे. तसेच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्यात त्यात पडून अपघातही झाल्याचे समोर आले. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने आणि वृत्त प्रसिद्ध झाल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली. त्यानुसार प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. खड्डे बुजविण्याच्या कामात कोणत्याही प्रकारे दिरंगाई होऊ नये, यासाठी ढाकणे यांनी कनिष्ठ अभियंत्यांना चांगलाच दम भरला आहे.
गणेशविसर्जन मिरवणुकीनंतर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या स्थितीची पाहणी केली. त्यानुसार खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील रस्ता दुरुस्ती करणाऱ्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुधवारी १५ गाड्या सिंहगड रस्त्यावर दुरुस्तीच्या कामासाठी पाठवण्यात आल्या. कात्रज कोंढवा रोडवर ५ गाड्या तैनात करण्यात येतील. त्यानंतर नगर रोड, मगरपट्टा रोड, अशा सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल. कनिष्ठ अभियंता यांना खड्डे बुजविण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत हे झाले नाही तर ९ ऑक्टोबरपासून संबधित त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.