महाज्योती, सारथीतर्फे मिळणार फक्त ५० विद्यार्थ्यांना फेलोशिप; ८०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची विद्यार्थ्यांची मागणी
अमोल अवचिते
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थांकडून पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते. महाज्योजी आणि सारथीकडून अनुक्रमे १२०० आणि ८५१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत होती. आता त्या संख्येत बदल करण्यात आला असून केवळ ५० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्यां विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
राज्य सरकारच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सचिवांच्या उच्च समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला महाज्योती आणि सारथी संस्थे अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच संघटनांनी विरोध केला आहे. ओबीसी व मराठा विद्यार्थ्यांच्या लोकसंखेच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील कोणत्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा निर्णय अधांतरी व घाईघाईने तसेत कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता घेतला आहे. यानिर्णयामुळे हजारो संशोधक विद्यार्थ्याच्या भवितव्यावर घाला घालणारा आहे. अनेक संशोधक विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. हा निर्णय राज्याची संशोधनात्मक दूरदृष्टीवर काळी पट्टी बांधणारा आहे. महाज्योतीने गेल्या वर्षी व यंदाच्या चालू वर्षात मंजूर करण्यात आलेल्या संशोधन फेलोशिपमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मागील वर्षी महाज्योतीने १२०० विद्यार्थ्यांना व सारथीने सुमारे ८५१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देत होती. यंदा असे काय झाले की सरकारला या निर्णयात बदल करावा लागला. एकीकडे मराठा समाजाचे आरक्षणासाठी लढा सुरु आहे. मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना या फेलोशिपचा मोठा आधार आहे. त्यामुळे ही संख्या कमी करुन एक प्रकारे विद्यार्थ्यांची संधी हिरवण्याचा प्रकार आहे. यावर राज्य सरकारने पुन्हा एका उघड्या डोळ्यांनी विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि संघटनांनी केली आहे.
ओबीसी, व्हिजेएनटी व मराठा या समाजातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, केवळ ५० ची संख्या मंजूर करण्यात आली आहे, ही त्या तुलनेने संख्या अतिशय कमी आहे. ओबीसी, विजेएनटी व एसबीसी, मराठा कुणबी यांची राज्यातील लोकसंख्या विचारात घेता, किमान ८०० विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधक शिष्यवृत्ती महाज्योती व सारथी यांनी देण्याची गरज आहे. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच या मागण्यासाठी नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आवाज उठवला होता.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या...
- महाज्योती व सारथीने संशोधक फेलोशिपची संख्या ५० वरुन ८०० करावी.
- महाज्योती व सारथी ने संशोधक फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा न घेता मुलाखतीने करावी.
महाज्योती व सारथी या संस्था ओबीसी व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. परंतु ते विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे निर्णय घेत असतात. ओबीसी व मराठा समाजाच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे हे याचे एक उदाहरण आहे.
- प्रा. दिवाकर गमे, माजी संचालक, महाज्योती
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असताना सरकारने सारथी कडून दिल्या जाणाऱ्या मराठा समाजातील पीएचडी संशोधकांच्या संख्येत कमी केली आहे. मी स्वतः दुष्काळी भागातून येतो, पीएचडी संशोधकांना आर्थिक मदतीशिवाय संशोधन करणं अशक्य असते, अशा निर्णयामुळे मराठा समाजातील संशोधकांची संख्या घटेल. मराठा समाजातील मुलांचा परदेशी शिक्षणाचा प्रश्न विलंबित असतानाच अशा प्रकारचा निर्णय घेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे.
- अशोक जोगदंड, विद्यार्थी.
पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५१ वरून फक्त ५० करण्याचा निर्णया निषेध. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील गोरगरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शहरात भोजन व निवासाचा खर्च भागवून दीर्घकाळ संशोधन करणे अवघड आहे. मुळातच घरून मिळणारी तुटपुंजी मदत व त्यात शैक्षणिक खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य असल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी दर्जेदार संशोधन करण्यास मुकणार असून हे विद्यार्थ्यांसह शैक्षणिक व्यवस्थेचे देखील अपयश ठरेल. सरकारने आपल्या निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करावा.
- कृष्णा साठे, विद्यार्थी
पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची, त्यांच्या प्रवेशासाठी महाज्योती किंवा सारथीने परीक्षा घेऊ नये. सारथी यापूर्वी या संशोधक विद्यार्थ्यांचे, त्या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएटचे पदव्युत्तरचे गुण आणि ज्या विषयात पीएचडी केली जाते, त्यामधील सारथीने नेमलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून मुलाखतीव्दारे दिलेले गुण, या आधारे निवड केली जात असे. त्यामुळे मुलाखत घेणे ही एक आदर्श पध्दत आहे. शिवाय यामुळे परीक्षेवर होणारा लाखो रुपयांचा खर्च निधी देखील वाचणार आहे.
- राहुल ससाणे, विद्यार्थी विद्यापीठ संघर्ष कृती समिती.
मुख्य सचिवांनी घेतलेल्या निर्णयानुसार फेलोशिपसाठी संख्या :
संस्था : विद्यार्थी संख्या
महाज्योती : ५०
सारथी : ५०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) : २००
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) : १००
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.