धाकधुक संपली ! अखेर पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
पुणे : पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहिर करण्यात आला होता. मात्र अध्यक्षांची बदली झाल्याने बोनस वेळेत खात्यावर जमा होईल का? असा मनात प्रश्न निर्माण झाला होता. तसेच बोनसच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची सही कधी होईल अशी धाकधुक पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये होती. अखे महापालिका आयुक्तांच्या सहीनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बुधवारी संध्याकाळी खात्यावर दिवाळी बोनस जमा झाला. पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड असून त्यांनी आनंद व्यक्त केला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३ टक्के व बक्षिस २१ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. महापालिकेच्या सेवकांना मंगळवारी बोनस देण्यात जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा देण्याची मागणी पीएमपी कर्मचारी करीत होते.
पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिकेकडून संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. पीएमपीकडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकांकडे पाठविण्यात आले होते. दरम्यान, पुणे महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र गेल्या १५ दिवसापासून आयुक्तांच्या टेबलवर हा प्रस्ताव तसाच पडून होता. यामुळे पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालत बोनस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आनंदात दिवाळी साजरी करता येणार आहे.