कष्टकरी कुटुंबावर नियतीचा घाला, विजेच्या धक्क्याने दोन चिमुकल्यांनी गमावले प्राण

लेबर कॅम्पमध्ये ठेकेदाराने जुन्या केबल लावून त्यांच्या घरामध्ये वीज जोडून दिलेली होती. वारा आणि पावसामुळे ही वायर पत्र्याला घासून घरात विजेचा प्रवाह उतरला होता. यातच घरात खेळत असलेल्या दोन लहान मुलांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 9 Sep 2023
  • 03:01 pm
hardworking : कष्टकरी कुटुंबावर नियतीचा घाला, विजेच्या धक्क्याने दोन चिमुकल्यांनी गमावले प्राण

कष्टकरी कुटुंबावर नियतीचा घाला, विजेच्या धक्क्याने दोन चिमुकल्यांनी गमावले प्राण

मुंढव्याच्या ब्ल्यू चीफ डेव्हलपमेंट एलएलपी बांधकाम साईटवर घडली होती घटना

पुण्यातील मुंढवा येथील ब्ल्यू चीफ डेव्हलपमेंट एलएलपी या बांधकाम साईटमध्ये असलेल्या लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबावर जून महिन्यात आघात झाला होता. लेबर कॅम्पमध्ये ठेकेदाराने जुन्या केबल लावून त्यांच्या घरामध्ये वीज जोडून दिलेली होती. वारा आणि पावसामुळे ही वायर पत्र्याला घासून घरात विजेचा प्रवाह उतरला होता. यातच घरात खेळत असलेल्या दोन लहान मुलांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना ३० जून रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी तपास करून मुंढवा पोलिसांनी लेबर कॉन्ट्रॅक्टर विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल केला आहे.

धरू काळे (रा. नऱ्हे, आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलांची आई पूजा गणेश पोटफोडे (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत शौर्य गणेश पोटफोडे (वय ८) आणि कान्हा गणेश पोटफोडे (वय ६) या चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा  आणि त्यांचे पती गणेश पोटफोडे हे ब्ल्यू चीफ डेव्हलपमेंट या साईटवर मजूर म्हणून काम करत होते. धरू काळे याने त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवलेले होते. या साइटवर कामगारांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले आहेत.

या शेडमध्ये हे कुटुंब राहत होते. या शेडमध्ये त्यांनी बिल्डिंगमधील लाईट मीटर मधून जुन्या केबलच्या आधारे लाईट लावून दिली होती. ही लाईट लावताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. त्याने या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना असताना देखील हलगर्जीपणा केला. घटनेच्या दिवशी जोरात पाऊस पडत होता आणि वारा देखील सुटलेला होता. जुनी केबल असल्याने ती पत्र्याला घासून तिच्यामधून पत्र्यामध्ये वीज प्रवाह उतरला. हा विजेचा प्रवाह घरामध्ये सगळीकडे पसरला होता.

घरामध्ये खेळत असलेल्या शौर्य याचा धक्का पत्र्याला लागला आणि तो त्याला चिकटला.. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्यापेक्षा लहान असलेला सहा वर्षांचा कान्हा देखील तिथे चिकटला. घरात कोणीही नसल्याने त्यांची सुटका होऊ शकली नाही. विजेच्या धक्क्याने तडफडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर, पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी लेबर कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले म्हणाले की, विजेचा धक्का बसल्याने ब्ल्यू चीफ डेव्हलपमेंट एलएलपी या बांधकाम साईटवर दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना लेबर कॉन्ट्रॅक्टरची चूक असल्याचे समोर आले आहे. त्याने कामगारांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले आहेत. त्यामध्ये विजेचे कनेक्शन देताना खबरदारी घेतलेली नव्हती. वायर तुटून त्यातून वीज प्रवाह पत्र्यात उतरला. त्याला घरात खेळत असलेली मुले चिकटली आणि त्यांचा मृत्यू झाला. आरोपीचा शोध सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest