मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, दोघे जागीच ठार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विरुद्ध बाजूने येणाऱ्या कंटेनरने डिव्हायडर ओलांडून चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघे ठार झाले तर चार जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ढेकू गावाजवळ आज सकाळी ९.३० च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरने पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. मात्र, कंटेनर क्रॅश बॅरिअर आणि डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनवर गेला. त्यानतंर कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारसह चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर महामार्ग देवदूत कर्मचाऱ्यांनी जखमींना जवळील दवाखान्यात भरती केले. अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोपोलीमार्गे वळवण्यात आली होती. पुण्याकडे जाणाऱ्या या मार्गावर अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.