Electricity : अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पुणे, पिंपरी चिंचवडमधील ३.५५ लाख वीजग्राहक अंधारात

अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 19 May 2023
  • 11:59 am
पुणे, पिंपरी चिंचवडमधील ३.५५ लाख वीजग्राहक अंधारात

पुणे, पिंपरी चिंचवडमधील ३.५५ लाख वीजग्राहक अंधारात

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. रात्री १०.३० नंतर या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये आज रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सोबतच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार असे एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर १३२ केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे.

या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास महापारेषणच्या सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत खंडित असलेला सर्व भागातील वीजपुरवठा रात्री ११.३० वाजेनंतर सुरळीत करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest