पंतप्रधानांच्या दौर्याचा खर्च महापालिकेच्या खिशातून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमांसाठी झालेला खर्च महापालिकेच्या खिशातून दिला जाणार असल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमांसाठी झालेला खर्च आदा करण्यासाठी १ कोटी 85 लाख 469 रुपये खर्चास मान्यतेचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा 1 ऑगस्ट 2023 रोजी पुण्यात दौरा केला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या मंडप व बैठक व्यवस्थेचा 1 कोटी 85 लाख 469 रुपये खर्च महापालिकेच्या खिशातून दिला जाणार आहे. यासंबंधीच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर मोदी यांच्या हस्ते पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि पुणे मेट्रोच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी पोलिस मैदानावर मंडप आणि 7 हजार नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमांचा 1 कोटी 85 लाख 469 रुपये खर्च पुणे महापालिकेवर टाकण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम ऐन पावसाळ्यात होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बंदिस्त जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच 'जी-20' परिषदेच्या कार्यक्रमाला मंडप टाकण्यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला होता, त्यांच्याकडूनच ही कामे तातडीने करून घेण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.