पंतप्रधान आवासमध्ये पाण्यासाठी वनवास; खराडीतील नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागतेय वणवण
-अमोल अवचिते
पुणे: पंतप्रधान आवास योजनेतून (पीएमएवाय) महापालिकेने शहारातील प्रकल्प पूर्ण केले आहेत. मोठा गवगवा करत सर्व कामे पूर्ण झाली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घराची चावी लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. मात्र पीएमएवाय योजनेतील शिवनेरी पीएमवाय गृहसंस्था मर्यादीत या खराडीतील प्रकल्पात महापालिकेची पाण्याची पाईप लाईनच जोडण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
पीएमएवाय योजनेतून महापालिकेने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी किमतीमध्ये फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या हस्ते या योजनेतील लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली आहे. खराडीत एकूण ७८६ सदनिका आहेत. अनेकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन घराचा ताबा घेतला आहे. तसेच राहण्यास देखील सुरवात केली आहे. सुरवातीच्या दिवसांमध्ये सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. त्यामुळे वापरायच्या पाण्याची कोणतीही समस्या नव्हती. मात्र टाकी अस्वच्छ असल्याने पिण्यासाठी पाणी बाहेरुन आणले जात आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. अद्यापही ती स्वच्छ करण्यात आली नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी बाहेरुनच आणावे लागते. आता राहण्यास येणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले आहे. काही वेळा पाणी नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. टॅंकर पंधरा दिवसातून एकदा येत आहे. महापालिकेकडून सोसायटीच्या टाकीमध्ये नळजोड देण्यात आला आहे. मात्र मुख्य पाईप लाईनला अद्याप लाईन जोडली नसल्याने पाणीच येत नाही. त्यामुळे पाईप लाईन आहे, पण पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ पाण्याची कायमस्वरुपी सोय करुन द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी किमतीमध्ये फ्लॅट उपलब्ध करून देण्यासाठी वडगाव बुद्रूक, खराडी येथे प्रत्येकी एक तर हडपसर येथे तीन प्रकल्प तयार केले आहेत. या पाच ठिकाणी मिळून एकूण २९०० फ्लॅट तयार आहेत. त्याचे लाभार्थी लॉटरी काढून ठरविण्यात आले आहेत. पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच घराची चावी लाभार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी घराचा ताबा घेतला आहे. खराडीत ७८६ सदनिका आहेत. आता दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर अनेकजण राहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे महापालिकेकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्याची मागणी येथील नागरिकांची आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पाणी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात आता दसरा आणि दिवाळीच्या मुहुर्तावर जवळपास सर्वच सदनिका धारक राहण्यास येणार आहेत. त्यामुळे महापालिकेने आताच सावध होत पाण्याच्या पाईप लाईनची जोडणी करुन द्यावी. सोसायटीत राहण्यासाठी येऊन आता दोन महिने होत आले आहेत. मात्र अद्याप एकदाही कोणी झाडू मारला नसल्याचे दिसले नाही. त्यामुळे सोसायटीमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येत आहे. रस्त्यावर तसेच पार्किंगमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
- नागरिक, शिवनेरी पीएमवाय गृहसंस्था मर्यादीत, खराडी.
देखभाल दुरुस्ती पोटी (मेन्टेनस ) १८ हजार रुपये भरले, तरी सुविधा मिळेना...
सदनिकेच्या ताबा देताना शेवटा हप्ता म्हणून महापालिकेने देखभाल दुरुस्तीचे म्हणजेच मेन्टेनसचे १८ हजार रुपये एका वर्षासाठी घेतले आहेत. त्यानंतरच ताबा दिला आहे. त्यामुळे सर्व सुविधा मिळतील अशी आपेक्षा होती. सोसायटीत राहण्यास आलो त्यावेळी पाणी मुबलक प्रमाणात होते. आता मात्र एकाच महिन्यात पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. सुरक्षा रक्षकाला विचारले तर पाण्याची पाईप लाईन आहे. पण पालिकेच्या मुख्य पाईप लाईनला जोडणी झाली नसल्याचे त्याने सांगितले. तसेच स्वच्छता कोणाची नेमणूक केली आहे का असे विचारले असता, त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तो सांगतो. त्यामुळे याबाबत कोणाकडे तक्रार करावी हे समजत नाही. असे येथील नागरिकांनी सीवीक मिररला सांगितले.
सोलर वॉटर हिटर बंद , सौरदिवे दिवसाही सुरूच ...
अंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी इलेक्ट्रिक गॅस, घरगुती गॅस गिझर किंवा इतर साधनांचा वापर केला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यावर उपाय म्हणून सोसायटीमध्ये सोलर वॉटर हिटरची सुविधा देण्यात आली आहे. मात्र लोकांची संख्या कमी असल्याने ती अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे सोससायटीतील सौरदिवे दिवसाही सुरु असल्याचे दिसून येत आहे. सौरदिवे दिवसा बंद करावेत, आणि सकाळच्या वेळेत सोलर वॉटर हिटर सुरु करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
- फ्लॅट संख्या
>>हडपसर सर्वे क्रमांक १०६ अ - ३४०
>>हडपसर सर्वे क्रमांक ८९ - ५८४
>>हडपसर सर्वे क्रमांक १०६ अ - १००
>>खराडी सर्वे क्रमांक ५७ - ७८६
>>वडगाव खुर्द सिंहगड रस्ता - ११०८
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.