कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा, चंद्रकांत पाटलांच्या सुचना

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 21 Aug 2023
  • 04:09 pm
Chandrakant Patil : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा, चंद्रकांत पाटलांच्या सुचना

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा, चंद्रकांत पाटलांच्या सुचना

वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने १२५ वॉर्डनची नियुक्ती करा!

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करावी. त्यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी  महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनंजय देशपांडे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी आमदार योगेश टिळेकर, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडी समस्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कात्रज ते खडी मशीन चौक मार्गावरील कामांचा आढावा त्यांनी घेतला. पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून कात्रज-कोंढवा रस्त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर्स लावण्याचे काम पथ विभागांकडून हाती घेण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे. तीव्र उताराच्या ठिकाणी गतिरोधकपट्ट्या तयार कराव्यातखडी मशीन चौकातील स्मशानभूमीची जागा स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थलांतरित करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी  केल्या. दर महिन्याला शहरातील रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा घेण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी लागणाऱ्या जागांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मोजणी अधिकारी देण्याचे निर्देश जिल्हाधिक्षक भूमिअभिलेख यांना यावेळी देण्यात आले.  रस्त्याच्या आराखड्यात येणाऱ्या महावितरणचे खांब, आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचनाही महावितरणच्या मुख्य अभियंतांना देण्यात आल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest