पुण्यात २ कोटींची वीजचोरी, ड्रोनच्या सहाय्याने लावला छडा
वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल व पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद केला होता तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.
महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या उच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरु केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. सदरची वीजचोरी मोठी असल्याने व संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. २५ ऑगस्टला संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन त्यांनी एका मित्राच्यासह आत प्रवेश मिळवला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रिकरण सुरु केले व तोच बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.