वीजबिल थकले, ३० हजार पुणेकरांचा पुरवठा खंडीत; महावितरणची कारवाई वेगात

वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये ३० हजार २१७ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 26 Aug 2023
  • 03:05 pm
Electricity bills : वीजबिल थकले, ३० हजार पुणेकरांचा पुरवठा खंडीत; महावितरणची कारवाई वेगात

वीजबिल थकले, ३० हजार पुणेकरांचा पुरवठा खंडीत; महावितरणची कारवाई वेगात

थकीत वीजबिल भरा, सहकार्य करा - महावितरण

वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये ३० हजार २१७ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील ७ लाख ८० हजार ६११ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २०० कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती ६ लाख ७९ हजार ३७८ ग्राहकांकडे १३४ कोटी ३४ लाख रुपये, वाणिज्यिक ७९ हजार ४१८ ग्राहकांकडे ४५ कोटी १२ लाख रुपये आणि औद्योगिक ११ हजार ८१५ ग्राहकांकडे २० कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसात ३० हजार २१७  घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest